भविष्यवाणीतून केला लुटीचा धंदा; अमळनेरातील एकाचा नाशिकमध्ये प्रताप, ७३ लाख लंपास करून दुबईत पसार?

अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील व्यावसायिक संकुलात ‘अंजनेय ज्योतिष’ नावाने कार्यालय थाटून भविष्य सांगण्याच्या दाव्याखाली शेअर बाजारात गुंतवणुकीचे सल्ले देत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित संशयित हा अमळनेर येथील रहिवासी असून ७३ लाख रुपये लंपास करून दुबईत पसार झाला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,  नाशिकमधील एका किराणा व्यावसायिकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक व व्यावसायिक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी तो ‘अंजनेय ज्योतिष’ कार्यालयात गेला होता. संशयित सचिन देशमुख याने सांगितलेल्या काही उपायांमुळे प्रारंभी फायदा झाल्याने व्यावसायिकाचा त्याच्यावर विश्वास बसला. ‘गुरुजी’ म्हणून हायप्रोफाइल व्यक्तींमध्ये वावर असलेल्या देशमुखने शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

‘ग्रह-तारे आणि भविष्य’ यांचा आधार घेत मोठ्या नफ्याचे आश्वासन देत एक एप्रिल २०२५ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संबंधित व्यावसायिकाकडून तब्बल ७३ लाख रुपये गुंतवणूक करून घेतली आहे. यासाठी व्यावसायिकाने कर्जही काढले होते. काही महिन्यांनंतर व्यवहार थांबले आणि संशयिताने कार्यालयाला कुलूप ठोकून पलायन केल्याचे समोर आले. मूळ रक्कम किंवा नफा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी संशयित सचिन देशमुख याच्याविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे तपास करीत आहेत. पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, देशमुख हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी त्याने शरणपूर रोड परिसरात ‘अंजनेय ज्योतिष केंद्र’ सुरू केले होते. नाशिकमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना त्याच्या केंद्रामार्फत प्रायोजकत्व दिले जात होते. फेसबुकच्या माध्यमातून देशभरात त्याची प्रसिद्धी करण्यात आली होती. नाशिक, दिल्लीसह विविध शहरांत त्याचे दौरे होत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘श्री हनुमान प्रसन्न’ असल्याचा दावा करत तो नागरिकांचा विश्वास संपादन करत असल्याचेही तपासात उघड झाले.

 

संशयिताच्या कार्यालयाची घेतली झडती

 

संशयिताच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे व लॅपटॉप जप्त करण्यात आले असून डिजिटल पुरावे संकलनासह फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे. संशयिताच्या कौटुंबिक माहितीचा तसेच मूळ पत्त्याचा शोध घेण्यात येत आहे. तो केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनीही पुढे येऊन पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *