
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रताप हायस्कूलमध्ये २५ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश भेट
अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षणासाठी आर्थिक अडचण कधीही अडसर ठरू नये, या सामाजिक जाणिवेतून खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप हायस्कूलमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. बाम्हणे येथील पोलीस पाटील तथा अमळनेर तालुका शेतकी संघाचे उपाध्यक्ष गणेश भामरे यांच्या दातृत्वातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अमळनेर तालुका शेतकी संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील आणि गणेश भामरे यांच्या हस्ते स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. पी. बाविस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट केला.
मनोगत व्यक्त करताना गणेश भामरे यांनी स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा तसेच पाडळसरे धरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून त्यांनी समाजकारण आणि विकासाची प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळाल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात शिक्षक प्रतिनिधी दिनेश पालवे यांनी स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या प्रभावी प्रशासनशैली, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांशी असलेल्या दृढ नात्यावर प्रकाश टाकला. यानंतर गणेश भामरे यांच्या हस्ते २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी गणेश भामरे यांनी सांगितले की, “गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलवणारा गणवेश हा केवळ पोशाख नसून शिक्षणाची नवी उमेद आहे. आमचे नेते व मार्गदर्शक माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमातून स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास खांजोडकर यांनी केले, तर आभार सचिन अहिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निखिल पाटील, कृष्णा कोळी, सागर पवार, प्रसाद बुवा, जयश्री पाटील आणि नम्रता दोरकर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply