
कुऱ्हे खुर्द व नांद्री येथे कापूस उत्पादकता वाढीसाठी शेतकरी प्रशिक्षण
अमळनेर (प्रतिनिधी) कृषी विभागाच्या पातोंडा मंडळात कापूस उत्पादकता अभियान अर्थात कपास कांती योजनेअंतर्गत सघन कापूस लागवड प्रात्यक्षिक आणि क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिक राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कापूस उत्पादन वाढविण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे आणि मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुऱ्हे खुर्द व नांद्री येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडले.
कुऱ्हे खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी कविता बोरसे यांनी, तर नांद्री येथे सहाय्यक कृषी अधिकारी चेतन चौधरी यांनी कपास कांती अभियानाची प्रस्तावना करून योजनेची उद्दिष्टे शेतकऱ्यांसमोर मांडली. त्यानंतर उप कृषी अधिकारी प्रविण पाटील यांनी आधुनिक पीक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादनात वाढ कशी करता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अधिक उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या वाढविणे, त्यानुसार संतुलित खत व्यवस्थापन वेळेवर करणे, तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक व्यवस्थापन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अल निनोच्या संभाव्य परिणामांपासून कापूस पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
कापूस पिकावरील संभाव्य किडी व रोगांची ओळख, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, तसेच जैविक कीड नियंत्रणाच्या प्रभावी पद्धतींबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक शेतीला पूरक ठरणाऱ्या जैविक कीड नियंत्रणाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महिला बचत गटातील सदस्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न उन्नयन अभियान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाला कुऱ्हे खुर्द येथे माजी सरपंच भानुदास पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, शरद पाटील उपस्थित होते. तर नांद्री येथे विनोद आत्माराम देसले, कैलास हरचंद भदाणे, राहुल मधुकर चौधरी, शांताराम नवल पाटील, चुडामन भगवान पवार, अनिल गंगाराम बागुल, योगिता कैलास भदाणे, सुनंदा देविदास खैरनार यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उप कृषी अधिकारी योगेश वंजारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अनिकेत सूर्यवंशी, निलेश पाटील, नवल वाघ आणि सुषमा बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. कृषी विभागाच्या या अभियानामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनवाढीस निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply