सावखेडा येथे बेकायदेशीर डिझेल साठा उघड; दीड लाखांचा १५२० लिटर डिझेल जप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथे वाळूच्या ठेक्यांवर सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा १५२० लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा आढळून आल्याची घटना २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तापी नदीपात्रातील सावखेडा येथील वाळू ठेक्याजवळ बेकायदेशीर डिझेल साठा असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम यांना पथकासह कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांनी सावखेडा येथे नदीपात्रात जाऊन छापा टाकला. या कारवाईदरम्यान २०० लिटर क्षमतेचे डिझेलचे १० कॅन आढळून आले. त्यापैकी सात कॅनमध्ये प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे एकूण १४०० लिटर डिझेल, दोन कॅनमध्ये प्रत्येकी ५० लिटर प्रमाणे १०० लिटर डिझेल आणि एका कॅनमध्ये २० लिटर डिझेल असा एकूण १५२० लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची एकूण किंमत १ लाख ५५ हजार ४० रुपये असल्याचे सांगण्यात आले. अधिक चौकशीअंती हा डिझेल साठा गिरीश तुळशीराम बेलदार यांचा असल्याचे समोर आले. दरम्यान, शेतीच्या कामांसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असताना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा सापडल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गिरीश बेलदार यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ व २८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *