
रानभाज्यांनी सजला साने गुरुजी बालवाडीचा सोहळा; वनभाजी महोत्सवात सकस आहाराचा जागर
अमळनेर (प्रतिनिधी) : रानातल्या विविध रानभाज्या, हिरवाईचा संदेश देणारे प्रकल्प, आदिवासी बांधव-भगिनी व शेतकरी वेशभूषेतील विद्यार्थी आणि पालकांनी तयार केलेल्या पौष्टिक हिरव्या पदार्थांची मेजवानी अशा उत्साहपूर्ण वातावरणात येथील साने गुरुजी बालवाडी विभागात वनभाजी महोत्सव, ग्रीन डे व पाककला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच निसर्गप्रेम, रानभाज्यांचे महत्त्व आणि सकस आहाराचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ यामध्ये तुकाराम महाराजांनी निसर्गातील झाडे, वेली, पक्षी व प्राणी यांना आपले सोबती व नातेवाईक मानले आहे. या अभंगाच्या तालासुरावर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वनभाजी महोत्सव व ग्रीन डेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प देण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने प्रकल्प तयार करून आणले. या प्रकल्पांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. काही विद्यार्थी आदिवासी बांधव-भगिनींच्या वेशात, तर काही विद्यार्थी शेतकरी वेशात तयार होऊन कार्यक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी रानात मिळणाऱ्या निरनिराळ्या रानभाज्याही आणल्या होत्या. त्यामुळे वनभाजी महोत्सवाला निसर्गाशी जोडलेले आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले. यासोबतच महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला पालकांनी विविध प्रकारचे हिरवे व पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. सर्व पदार्थ सुंदर आणि चवीला चवदार होते. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पालकांमधूनच काही परीक्षक निवडण्यात आले. या स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले. सर्व विजेत्यांना जागेवरच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे व सहसचिव अशोक बाविस्कर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या सकस पोषण आहाराबद्दल तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडवावा, याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, भास्कर बोरसे, तसेच सर्व संचालक मंडळ व साने गुरुजी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक संजीव पाटील, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका लतिका शिंगाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सोनार यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, विविध प्रकल्प, रानभाज्यांची मांडणी आणि पालकांनी तयार केलेले पौष्टिक पदार्थ यामुळे वनभाजी महोत्सव, ग्रीन डे व पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply