शिक्षकांकडून पाठ्यपुस्तकांची हमाली; अमळनेर शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर व्यक्त होतोय संताप

अमळनेर (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर अमळनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शासनाच्या नियमांविरोधात जाऊन भरउन्हात पाठ्यपुस्तकांची हमाली करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी आणि नियोजनशून्य कारभारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, ही जबाबदारी केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांवर ढकलण्यात आल्याचा आरोप होत आहे. मंगरूळ येथील शाळेत साठवून ठेवलेली पुस्तके संबंधित शाळांपर्यंत नेण्यासाठी मुख्याध्यापकांना तोंडी आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पाठ्यपुस्तकांच्या वाहतुकीसाठी कोणतीही आगाऊ रक्कम किंवा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने शिक्षकांना स्वतःच्या खिशातून ५०० ते १००० रुपये खर्च करून खाजगी वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. काही ठिकाणी शिक्षकांना पुस्तकांचे गठ्ठे स्वतः उचलून वाहून न्यावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. समग्र शिक्षा अभियान आणि पीएमश्री योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतात. शाळा सुरू होण्यापूर्वीच अमळनेर शिक्षण विभागाकडे पाठ्यपुस्तकांचा साठा उपलब्ध झाला असून १५ जूनपूर्वी ती शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. मात्र, या कामासाठी स्वतंत्र वाहतूकदार नियुक्त न करता शिक्षकांनाच वाहतुकीची जबाबदारी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत विचारणा केली असता प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणाले, “ती जबाबदारी केंद्रप्रमुखांची आहे. त्याबाबत मी लेखी आदेश दिले आहेत.”

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी निलेश पाटील यांनी, “या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील,” असे सांगितले.

शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांनाच पाठ्यपुस्तकांच्या वाहतुकीसाठी हमालाची भूमिका बजावावी लागत असल्याने शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *