भाजपला अमळनेरात धक्का; माजी आरोग्य समिती सभापती श्याम पाटील यांचा राजीनामा

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलिस कारवाईवर नाराजी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष श्याम जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी २६ जुलै २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाचे जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीनामा पत्रात श्याम जयंतराव पाटील यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना समाजहितासाठी सातत्याने काम केल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात विद्यार्थी व तरुणांनी शांततामय पद्धतीने केलेल्या आंदोलनावर झालेल्या लाठीमार आणि पोलिस कारवाईबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्याचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर शक्तीचा वापर करण्यात आल्याने लोकशाही मूल्यांना धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर आपल्या वैचारिक भूमिकेत आणि पक्षाच्या सध्याच्या भूमिकेत मूलभूत मतभेद निर्माण झाल्याचे सांगत, सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक प्रामाणिकतेच्या भूमिकेतून आपण भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे श्याम जयंतराव पाटील यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. श्याम जयंतराव पाटील यांच्या राजीनाम्यामुळे अमळनेरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच त्यांच्या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *