
हरिनामाच्या गजरात नगाव ते अमळनेर भव्य दिंडी; विठुराया चरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण
अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नगाव ते संत सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेर दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ जुलै रोजी संत दगडू बाबा यांच्या आशीर्वादाने भव्य दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल-विठ्ठल”च्या अखंड गजरात निघालेल्या या दिंडीत हजारो वारकरी, महिला, युवक आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठुरायाच्या चरणी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
अमळनेर तालुक्यातील नगाव, गडखांब, कचरे, धुपी तसेच परिसरातील विविध गावांमधील वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, अभंग आणि विठ्ठल नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांमुळे मार्गावरील वातावरण विठ्ठलमय झाले होते. दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले. या दिंडी सोहळ्यास डी.वाय.सी. वासुदेव देसले, रीता बाविस्कर, पंचायत समितीचे अधिकारी भूपेंद्र बाविस्कर, सुषमा देसले, माजी पंचायत समिती सभापती दिलीप रामदास पाटील (शिंदखेडा) तसेच माजी नगराध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे उत्साहवर्धन केले. उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. दिंडीचे नियोजन आणि आयोजन महेश पाटील (नगावकर), सतीश पाटील (जळगाव), अशोक पाटील (फॅक्टरीवाले), विनोद जाधव, रामकृष्ण पाटील, काशिनाथ महाराज, नंदलाल पाटील, योगेश कोळी, संजीव कुमार, नाना नाईक, सुदाम पारधी, भास्कर नाना, राजू नाना, आनंदा आबा, धना बापू, सुभाष पाटील, विजय शालिक पाटील, अनिल पाटील (मंडपवाले), दिनेश पाटील, सुरेश पंचभाई, दिलीप पाटील, दत्तू पाटील, मनोहर पाटील, सुरेश पाटील, कमलेश पाटील, अंकुश पाटील, राजेंद्र पाटील, बोलूभाऊ गाडीवाले, किरण पाटील (चालक), दीपक पाटील, रघुनाना, पिऊन नाईक, मगन नाईक आणि विजू देसले यांनी केले. या सर्व कार्यकर्त्यांनी दिंडीचे सुयोग्य नियोजन करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. दिंडीमध्ये मोठ्या संख्येने महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच पंचक्रोशीतील भाविक सहभागी झाले होते. विठ्ठल नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी “इडा-पिडा जाऊ दे, बळीराजाचे राज्य येऊ दे” असा जयघोष करत विठुरायाच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. भक्ती, समता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा परिसरातील भाविकांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला. विठ्ठलभक्तांच्या अखंड नामगजराने अमळनेर परिसर भक्तिमय झाला असून, वारकरी परंपरेचा संस्कार आणि अध्यात्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या दिंडीच्या माध्यमातून प्रभावीपणे घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply