
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त श्रमदानातून रस्त्याची डागडुजी; नागरिकांच्या लोकसहभागातून आदर्श उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) थोर समाजसेवक, साहित्यिक आणि मानवतेचे उपासक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गुरुवारी श्रमदानातून साने गुरुजी स्मारक परिसरातील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. लोकसहभागातून पार पडलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत साने गुरुजींच्या श्रमप्रतिष्ठा आणि समाजसेवेच्या विचारांना कृतीची जोड दिली.
उपक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, खान्देशातील श्रमसंस्कार छावण्यांतून घडलेली तरुणाई, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मुरूम टाकणे तसेच रस्ता समतल करण्याची कामे करण्यात आली. परिसरातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता खराब झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. लोकसहभागाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमासाठी स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील, अमेय मुंदडा, डॉ. विकास हरताळकर, नगरसेवक अनिल महाजन, चेतन सोनार तसेच माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे श्रमदान मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली.
सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या श्रमदानात डॉ. मिलिंद वैद्य, गोपाळ नेवे, चेतन भोई, शुभम पवार, प्रथमेश कोठावदे, दिलीप सोनवणे, संदीप घोरपडे, शिव निकम, सुनील वाघमोडे, डॉ. अतुल चौधरी, तुषार पाटील, किशोर महाजन, हेमंत बडगुजर, प्रणव पाटील, विक्रांत पाटील, दर्शना पवार, लोकेश वाणी, हेमंत भामरे, भागवत गुरुजी, डॉ. दिनेश पाटील, उमेश चौधरी, सुनील पाटील, संदीप चौधरी, सतीश देशमुख, रोहित चौधरी, डॉ. संदीप सराफ, गौरी सराफ, मनीष सराफ, आर. पी. पवार यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. या श्रमदान उपक्रमातून साने गुरुजींनी दिलेला श्रमप्रतिष्ठा, लोकसहभाग आणि समाजहिताचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचा प्रयत्न दिसून आला. सहभागी नागरिकांचे आभार मानताना भविष्यातही अशाच लोकहिताच्या आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply