एसटी बसमधील सोन्याची पोत चोरीचा दोन तासांत उलगडा; दोन महिला जेरबंद

अमळनेर (प्रतिनिधी)  एसटी बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या दोन महिलांना अमळनेर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मालेगाव परिसरातून अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. तातडीने केलेल्या तपासामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूड येथील कल्पनाबाई अशोक शिंपी (वय ६५) या ९ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजता अमळनेर बसस्थानकावरून शिरूडकडे जाणाऱ्या मुकटी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने चढताना त्यांची ओढाताण झाली. काही वेळानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीची, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

महिलेने बसमध्ये तसेच बसस्थानक परिसरात पोत शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल होण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपासाची सूत्रे हलवली.

पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांच्यासह प्रशांत पाटील, सूर्यकांत साळुंखे, उज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे, उज्वल पाटील व नितीन मनोरे यांच्या पथकाने बसस्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये दोन संशयित महिला बसजवळ व नंतर एका रिक्षामध्ये बसताना दिसून आल्या.

या धाग्यावरून पोलिसांनी तातडीने रिक्षाचा माग काढला. पाठलाग करत मालेगावजवळ संबंधित रिक्षा अडवून दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले. शारदा सुनील कसबे (वय ३५) आणि माया श्रावण कांबळे (वय ५५), दोघीही धुळे येथील रहिवासी असून सध्या चाळीसगाव रोडवरील पवननगर परिसरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत चोरी करण्यासाठी या महिलांनी खास भाड्याने रिक्षा केल्याची माहिती समोर आली आहे. चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपी महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याने नागरिकांकडून अमळनेर पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *