
‘देऊळ बंद-२’ची टीम आज अमळनेरात; एसएस सिनेप्लेक्समध्ये प्रेक्षकांशी थेट साधणार संवाद
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकरी आत्महत्येच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करणारा आणि प्रभावी सामाजिक संदेश देणारा ‘देऊळ बंद-२’ हा मराठी चित्रपट राज्यासह देश-विदेशातील प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने ५० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चित्रपटाचे निर्माते कैलाश वाणी आणि दिग्दर्शक प्रविण तराळे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, या दौऱ्याच्या निमित्ताने १२ जून रोजी दुपारी १२ ते ३ वाजेच्या शोदरम्यान अमळनेर येथील एसएस सिनेप्लेक्स, मिडटाऊन येथे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यावेळी चित्रपटाशी संबंधित अनुभव, चित्रपटामागील प्रेरणा आणि सामाजिक संदेश याविषयी टीम प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहे. ‘देऊळ बंद-२’ या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचा निर्णय निर्माते कैलाश बापू वाणी यांनी घेतला आहे. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, चित्रपट केवळ मनोरंजन न करता समाजप्रबोधनाचे कार्यही करत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक जाणीव जागृत करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, अमळनेरकर स्वामीभक्त, चित्रपटप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चित्रपटाला प्रतिसाद द्यावा तसेच सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष नितीन भदाणे, संचालक मंडळ, एसएस सिनेप्लेक्सचे सरजू गोकलाणी योगेश मुंदडा, बाळासाहेब देशमुख,हरीश देशमुख तसेच स्वामी समर्थ केंद्राचे डॉ. अमोल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply