अमळनेरचे मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र ‘दप्तरदिरंगाईत’ अडकले

दोनदा मोजणी आणि १ लाख ८० हजार शुल्क भरूनही दीड वर्षांपासून बांधकाम ठप्प; प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड

 

अमळनेर (प्रतिनिधी) खानदेशातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमळनेर शहरात मंजूर झालेले ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ अभ्यास केंद्र गेल्या दीड वर्षांपासून केवळ शासकीय कागदपत्रांच्या खेळात अडकले आहे. सुमारे दीड कोटी रुपये निधी असूनही केवळ जागा निश्चितीच्या तांत्रिक गोंधळामुळे आणि विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या केंद्राचे बांधकाम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही.

​नाशिक येथील विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी, वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट) आणि कार्यकारी अभियंता यांनी स्वतः अमळनेरला येऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न करता त्यांनी विद्यापीठाशी कोणताही संबंध नसलेल्या एका खासगी व्यक्तीला शासकीय कागदपत्रे हाताळण्याचे आणि पाठपुराव्याचे अधिकार बेकायदेशीरपणे दिले. या प्रकारामुळे प्रशासकीय प्रक्रियेला विलंब झाला असून, टाकरखेडा रस्त्यावरील शासकीय भूखंड क्रमांक ३७६ मधील जागा निश्चितीचा प्रश्न रेंगाळला आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ९३ हजार रुपये शुल्क भरून दोन एकर जागेची पहिली मोजणी झाली. मात्र, प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळी ती जागा उंच टेकडीवर असल्याने वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अयोग्य ठरली. आपली चूक लपवण्यासाठी प्रशासनाने पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे जादा जागेची मागणी केली. २३ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा ८७ हजार रुपये भरून मोजणी केली गेली. नगरपालिकेकडे बांधकाम परवानगी मागितली असता, संबंधित जागेवर बाजार समितीचे (APMC) आरक्षण असल्याचे समोर आले, ज्यामुळे पालिकेने परवानगी नाकारली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा पूर्ण चार एकर जागेची मोजणी होऊन दीड महिना उलटला, तरीही प्रत्यक्षात एक वीटही रचली गेलेली नाही.

 

अधिकाऱ्यांची बेजबाबदार उत्तरे

 

​या विलंबाबाबत माहिती विचारली असता, विद्यापीठाचे बांधकाम विभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. “माहिती हवी असल्यास माहिती अधिकार अर्जाद्वारे मिळवा,” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा:

 

“स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या खानदेशातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जर विद्यापीठाने त्वरित बांधकाम सुरू केले नाही, तर संपूर्ण खानदेशात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

 

बांधकामाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करू

 

​अमळनेर येथील भूखंड क्रमांक ३७६ मधील जागेवर पूर्वी बाजार समितीचे आरक्षण असल्याने अडचण आली होती. आता नव्याने ४ एकर जागेची मागणी करून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोजणी पूर्ण झाली आहे. विद्यापीठाचे वास्तुशास्त्रज्ञ आणि अभियंता यांच्यामार्फत बांधकामाची प्रक्रिया त्वरित पूर्ण केली जाईल.

डॉ. गोविंद कातळकुटे, कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *