
अमळनेरमध्ये पैसे दामदुप्पटच्या आमिषाने केळी व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक
सात आरोपींविरुद्ध जादूटोणा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) पैसे दामदुप्पट करून देण्याच्या आमिषाने अमळनेर येथील केळी व्यापाऱ्याला तब्बल ११ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या अजिंठा व संभाजीनगर येथील सात जणांविरुद्ध जादूटोणा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील केळी व्यापारी आसिफ छोटू बागवान हे व्यापारानिमित्ताने नेहमी संभाजीनगर व अजिंठा येथे ये-जा करत असत. त्यावेळी त्यांची ओळख शेख मुजाहिद शेख मुकीत, अकबर मकबूल मेवाती, अब्दुल मुक्कीम अब्दुल खालिफ शेख, प्रकाश गायकवाड, नंदू जाधव, शाहरूख अब्दुल मुकीत आणि फिरोजखा भिकनखा मेवाती यांच्याशी झाली. संबंधित आरोपींनी आसिफ बागवान यांना “आम्ही अनेकांची रक्कम दुप्पट करून दिली आहे, तुमचीही रक्कम दामदुप्पट करून देतो,” असे आमिष दाखवले. सुरुवातीला बागवान यांनी नकार दिला होता. मात्र १७ डिसेंबर २०२२ रोजी आरोपींनी त्यांना जाळ्यात ओढत त्यांच्या घरी पूजा विधी करून पैसे दुप्पट करून देण्याचे सांगितले. यासाठी आसिफ यांनी पत्नीचे दागिने विकून व इतर ठिकाणांहून उसने घेऊन एकूण ११ लाख रुपये जमा करून आरोपींना दिले. पूजा अत्यंत घातक असून यात जीव जाऊ शकतो, असे सांगून आरोपींनी आसिफ यांना घराबाहेर काढले आणि खोलीत धूर केला. या दरम्यान एका आरोपीने खरे पैसे जॅकेटच्या आतील खिशात ठेवून त्याठिकाणी बनावट नोटांचे बंडल ठेवले. त्या बंडलवर वरती एक-एक खरी नोट ठेवून आसिफ यांना त्यावर तांदूळ टाकत मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना धुळे रोडवर सोडण्यास सांगितले.
नंतर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी प्रतिज्ञापत्राद्वारे मुकुंदवाडी येथील ५ लाख रुपयांची मालमत्ता व ६ लाख रुपयांचा धनादेश देण्याचे लिहून दिल्याने त्यावेळी गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र संबंधित मालमत्ता व धनादेश दोन्ही बनावट असल्याचे पुढे निष्पन्न झाले. यानंतर आसिफ बागवान यांनी ॲड. सलमान शाह यांच्यामार्फत अमळनेर न्यायालयात याचिका दाखल केली. उपलब्ध पुरावे, कागदपत्रे व पोलिसांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३१९, ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३८, ३३६(३), ३५२, ३५१(१)(३), ३(५) तसेच जादूटोणा कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ॲड. साजिद शाह व ॲड. जुनेद शेख यांनी सहकार्य केले.

Leave a Reply