
पळासदडे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर २५ दिवस उलटले तरी कारवाई शून्य
संतप्त ग्रामस्थांचा निवडणूक बहिष्काराचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पळासदडे ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित प्रकरणाला २५ दिवस उलटूनही प्रशासनाकडून चौकशी किंवा दंडात्मक कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २६ जानेवारी २०२६ रोजी पळासदडे येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीतील विविध आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी कथित आर्थिक अनियमिततेबाबत स्पष्टीकरण मागितल्यावर संबंधित ग्रामसेविका यांनी दप्तर चौकात ठेवून ग्रामसभा सोडून निघून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “गट विकास अधिकारी स्वतः ग्रामसभेला उपस्थित राहत नाही तोपर्यंत ग्रामसभा घेऊ नये,” अशी ठाम मागणी केली होती.
यानंतर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेला पंचायत समिती अमळनेरचे गट विकास अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्या समोर ग्रामस्थांनी कथित अपहार व आर्थिक अनियमिततेसंदर्भातील पुरावे सादर केले. अधिकाऱ्यांनी या बाबींची नोंद आपल्या वहीत घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला २५ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी या प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. तरीही अद्याप कोणताही ठोस निर्णय किंवा कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शासनाने नुकताच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांमधून प्रशासकीय समिती नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. मात्र पळासदडे ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेत, ज्या पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा व्यक्तींना प्रशासकीय समितीवर नियुक्त करू नये, असा अर्ज प्रशासनाकडे सादर केला आहे.
आता या प्रकरणात पंचायत समिती अमळनेरचे गट विकास अधिकारी कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालून पळासदडे गावाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच कोणत्याही भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या व्यक्तीला पाठीशी घातल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पळासदडे गावात राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत प्रशासन या संदर्भात काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply