
बारदान मिळाल्याने शासकीय ज्वारी खरेदी पुन्हा सुरू; दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) बारदानाच्या अभावामुळे गेल्या दहा दिवसांपासून रखडलेली शासकीय ज्वारी खरेदी अखेर पुन्हा सुरू झाली आहे. पाच हजार बारदान प्राप्त झाल्यानंतर २९ जूनपासून अमळनेर येथील शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदीला पुन्हा सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी शासकीय ज्वारी खरेदीसाठी अमळनेर फ्रुटसेल सोसायटीला परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला एक हजार, त्यानंतर आणखी एक हजार आणि नंतर नऊ हजार क्विंटल असे टप्प्याटप्प्याने ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट अमळनेर तालुक्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. ज्वारीसाठी शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ६९९ रुपये हमीभाव जाहीर केला असून आतापर्यंत १ हजार २३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सुमारे साडेसात हजार क्विंटल ज्वारीची खरेदी पूर्ण झाली असून टाकरखेडा रस्त्यावरील नवीन गोदामात खरेदीसह ज्वारीचा साठा करण्यात येत आहे. मात्र, आठ ते दहा दिवसांपूर्वी ज्वारी भरण्यासाठी आवश्यक बारदान संपल्याने खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे एकीकडे खरेदीतील विलंब आणि दुसरीकडे खरीप हंगामातील शेतीची कामे यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. दरम्यान, शासकीय मका खरेदीसाठी ऑनलाइन केवळ ३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मक्यासाठी शासनाने प्रतिक्विंटल २ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी बाजार समितीत २ हजार २०० ते २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने शेतकरी शासकीय केंद्रावर मका विक्रीसाठी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे मका खरेदी अद्याप सुरू झालेली नाही.
२९ पासून नियमित खरेदी सुरू
“गेल्या आठ ते दहा दिवसापासून बारदान नसल्याने ज्वारी साठवायला बारदान नव्हते म्हणून ज्वारी खरेदी बंद करण्यात आली होती. २९ पासून नियमित खरेदी सुरू करण्यात आली आहे.”
– सुभाष पाटील, ग्रेडर, अमळनेर
५ हजार बारदान प्राप्त
“बारदान नसणे ही शासनाची अडचण आहे. ५ हजार बारदान प्राप्त झाले आहे. म्हणजे २५०० क्विंटल ज्वारी खरेदी केली जाईल. बारदान कलकत्ता येथून मुंबईला आणले जातात. त्यानंतर मुंबईहून सर्वत्र वितरित केले जातात.”
– भागवत पाटील, चेअरमन, फ्रुटसेल सोसायटी, अमळनेर

Leave a Reply