
राजपूत एकता मंचातर्फे शासकीय कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) : शासकीय कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा घटनांचा अमळनेर तालुका राजपूत एकता मंचाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी मंचाच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देण्यात आले असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात दोन गंभीर घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवरे, ता. पारोळा येथे ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामसेवक प्रल्हाद पाटील, वय ५२ वर्षे, यांच्यावर काही ग्रामस्थांनी मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी, वय ३१ वर्षे, हे ७ ऑगस्ट २०२६ रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे, या भूमिकेतून या दोन्ही घटनांकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंचाने केली आहे. राजपूत समाजातील दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नम्र परंतु ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
अशा घटनांमुळे केवळ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत नाही, तर प्रशासनाच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे राजपूत एकता मंचाने निवेदनात नमूद केले आहे. प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी सदर निवेदन स्वीकारले. यावेळी मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, अनिल पाटील, चेतन राजपूत, जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, अमोल राजपूत, कुणाल गिरासे, भोजराज राजपूत, दिलीप पाटील, रोहिदास पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, समाधान धनगर, अजयसिंग पाटील, आशिष राजपूत आणि भरतसिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply