
कर घेताय, सुविधा कुठे? जपान जिनसाठी राष्ट्रवादी आक्रमक; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) जपान जिन भागातील नागरिकांकडून नियमित कर वसूल करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. रस्ते, गटार, पथदिवे आणि कर आकारणीच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जपान जिन भागातील नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर नियमितपणे वसूल केले जात असतानाही या भागात रस्ते, गटार व पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने १५ दिवसांत जपान जिन भागाची प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जपान जिन हा निवासी क्षेत्र असूनही या भागावर औद्योगिक दराने कर आकारणी केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. नागरिक नियमितपणे घरपट्टी, पाणीपट्टी व इतर सर्व कर भरत असतानाही प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
निवेदनात पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. अन्यायकारक औद्योगिक कर आकारणी रद्द करून निवासी दराने कर आकारणी करावी, कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असल्याने तात्काळ सिमेंटचे रस्ते करावेत, गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने संपूर्ण भागात भुयारी गटार योजना राबवावी, अंधारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रत्येक खांबावर एलईडी व उंच प्रकाशझोत दिवे बसवावेत, तसेच आरक्षित मोकळ्या जागेवरील अतिक्रमण थांबवून तेथे लहान मुलांसाठी उद्यान व ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे बसवावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी सन २०२३ व २०२४ मध्ये वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांच्या आत प्रशासनाने जपान जिन भागाची प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सैय्यद अजहर अली यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली, शराफत अली ढेकेदार, इकबाल लोहार, मोहसीन अली, इम्रान बागवान, सैय्यद आसिफ, शरूख शेख, शरूख पठाण, अबीद शेख, फौजन शेख आदी उपस्थित होते. जपान जिन भागातील समस्त नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत आमदार अनिलदादा भाईदास पाटील, नगररचना विभाग व जिल्हाधिकारी, जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply