अत्यवस्थ रुग्णाला नेताना मंगरूळजवळ रुग्णवाहिका बंद; दुसऱ्या अपघातातील जखमीला खासगी वाहनाचा आधार

अमळनेर (प्रतिनिधी) दुरुस्ती करूनही ग्रामीण रुग्णालयाला संलग्न असलेली १०८ रुग्णवाहिका वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. १४ रोजी दुपारी अत्यवस्थ रुग्णाला धुळे येथे नेत असताना मंगरूळ येथील सेंट मेरी शाळेजवळ रुग्णवाहिका अचानक बंद पडली. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर जानवे येथून दुसरी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्याच परिसरात झालेल्या अपघातातील जखमीला अमळनेरची १०८ रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे न्यावे लागले. मोफत आणि तातडीची रुग्णसेवा देणाऱ्या यंत्रणेची ही अवस्था असेल तर गरजू रुग्णांना वेळेत उपचार कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक शांताराम सोनवणे (वय ४२) या रुग्णाला धुळे येथे नेत असताना एमएच १४ सीएल १०८७ क्रमांकाची रुग्णवाहिका मंगरूळजवळ बंद पडली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीही हीच रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने जळगाव येथे पाठवून दुरुस्त करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वणी गावाजवळ ती पुन्हा बंद पडली होती. दुरुस्तीनंतरही १४ रोजी पुन्हा तोच प्रकार घडला. अखेर जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न असलेली एमएच १४ सीएल १२५७ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यातून रुग्णाला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले.

वारंवार दुरुस्ती करूनही रुग्णवाहिका बंद पडण्यामागचे नेमके गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीच्या सेवेसाठी असलेले वाहनच वारंवार नादुरुस्त होत असेल तर त्याच्या दुरुस्तीवर होणारा खर्च, रुग्णांचा वाया जाणारा वेळ आणि त्यांच्या नातेवाइकांची होणारी धावपळ याला जबाबदार कोण, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मंगरूळजवळ आणखी एक अपघात झाला. भूषण वसंत खैरनार हे एमएच १२ एक्स ७८२५ क्रमांकाच्या मोटारसायकलने मंगरूळकडे जात असताना समोरून अमळनेरकडे येणाऱ्या जीजे ०५ आरडब्ल्यू ०२२० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात खैरनार यांचा पाय फ्रॅक्चर झाला. उपस्थितांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, अमळनेरहून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर त्यांना खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे न्यावे लागले.

 

  रुग्णवाहिका नादुरुस्त होण्याची सखोल चौकशी करणार

 

“अमळनेरच्या १०८ रुग्णवाहिकेच्या बॅटरीजवळ वायर स्पार्किंग झाली. पर्याय म्हणून जानव्याची गाडी पाठवली. दुपारच्या अपघाताच्या वेळी अमळनेरची रुग्णवाहिका पूर्ण दुरुस्त नव्हती. त्यामुळे जानवे येथील रुग्णवाहिका १३ मिनिटांत पोहोचली; पण तोपर्यंत रुग्ण खासगी रुग्णवाहिकेने निघून गेला होता. रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होण्याबाबत सखोल चौकशी करतो.” डॉ. चेतन अग्निहोत्री

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *