रब्बी हंगामासाठी ज्वारी खरेदी नोंदणी सुरू; अमळनेरमध्ये फ्रुटसेल सोसायटीला संधी

अमळनेर (प्रतिनिधी) मार्केटिंग फेडरेशनतर्फे रब्बी हंगामातील शासकीय भरड धान्य खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असून १ एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे. यंदा अमळनेर तालुक्यासाठी फ्रुटसेल सोसायटीला ज्वारी खरेदीची परवानगी देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी पत्राद्वारे संबंधित खरेदी संस्थांना आवश्यक निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, प्रथमच अमळनेर तालुक्यातील फ्रुटसेल सोसायटीला भरड धान्य खरेदीची जबाबदारी मिळाली आहे. नोंदणीची मुदत १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत असून प्रत्यक्ष खरेदी १ मे ते ३० जून या कालावधीत केली जाणार आहे. यंदा ज्वारीसाठी शासनाने ३७५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. सध्या बाजारात ज्वारीला २२०० ते २७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शासकीय खरेदीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक लाभ होणार आहे. मात्र प्रति हेक्टरी मर्यादा व तालुक्याचे उद्दिष्ट अद्याप जाहीर झालेले नाही.

 

प्राधान्यक्रमाने शेतकऱ्यांना बोलावणार

 

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक, शेती उतारा, सातबारा आदी कागदपत्रांसह अचूक मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. फ्रुटसेल सोसायटीत नोंदणी केल्यानंतर प्राधान्यक्रमाने शेतकऱ्यांना खरेदीसाठी बोलावण्यात येईल.

भागवत पाटील, चेअरमन, फ्रुटसेल सोसायटी अमळनेर

 

नोंदणीसाठी अडचणींचा सामना

 

ऑनलाईन सातबारा व उताऱ्यांची साईट गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. “साईट जाम असल्याने वारंवार तालुक्याला फेऱ्या माराव्या लागत आहेत.

एक  शेतकरी

 

६ एप्रिल रोजी आदेश प्राप्त

 

दिनांक  ६ एप्रिल रोजी संध्याकाळी आदेश प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ७ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५०९ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

लहू पाटील, व्यवस्थापक, फ्रुटसेल सोसायटी, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *