अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा महापूर; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किट वाटपाचा शुभारंभ

पुढील आठवड्यात बाधित कुटुंबांच्या खात्यात दहा हजारांची मदत जमा होणार; सुमारे १७०० कुटुंबांना मिळणार लाभ

 

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नगरपरिषद हद्दीतील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्याचा शुभारंभ शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील विविध केंद्रांवर जाऊन आमदार अनिल पाटील यांनी स्वतः बाधित नागरिकांना किराणा किटचे वाटप केले तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पुढील आठवड्यात प्रत्येक पात्र बाधित कुटुंबाच्या बँक खात्यात शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत जमा होणार असल्याची माहिती दिली. बाधित कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून किराणा किट वाटपाचे आदेश देण्यात आले होते. किराणा किट वाटपावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बाधित नागरिकांना मदत सहजपणे मिळावी यासाठी शहरातील आठ ठिकाणी स्वतंत्र वितरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

 

या केंद्रावर करण्यात आले वाटप

 

भोई समाज मंगल कार्यालय (पैलाड), शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (ताडेपुरा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (गांधलीपुरा), संत सखाराम महाराज वाडी, शिवाजी विद्या मंदिर (तांबेपुरा), क्षत्रिय कांचमाळी पंचमढी (बहादरपूर नाका रोड), शिवम कुटी बोर्डाजवळील केंद्र तसेच विद्या विहार कॉलनी गेटजवळील केंद्रांवर हे वाटप करण्यात आले. सुमारे १७०० हून अधिक बाधित कुटुंबांना या मदतीचा लाभ मिळाला असून प्रत्येक कुटुंबाला एक किराणा किट देण्यात आले. वाटप प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी घेण्यात आली.

 

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती

 

यावेळी नगरसेवक भरतकुमार ललवाणी, शोभाबाई गढरे, नरेंद्र संदानशिव, विजय कहारू पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, मुक्तार खाटीक, संजय कौतिक पाटील, विजय पाटील, दुर्गेश पाटील, विनोद लांबोळे, देविदास महाजन, दिनेश शेलकर, शांताराम महाजन, प्रविण महाजन, गंगाराम महाजन, भूषण भदाणे, वेद पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

वंचित कुटुंबांनाही मिळणार मदत

 

किराणा किट वाटपादरम्यान काही बाधित कुटुंबांची नावे मदतीच्या यादीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी प्रांताधिकारी मयूर भंगाळे तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी वंचित राहिलेल्या पात्र कुटुंबांनाही लवकरात लवकर किराणा किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या.

 

भूषण भदाणे यांच्या पाठपुराव्याने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा

 

३१ जुलैच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील गुरुकृपा कॉलनी, संत प्रसाद नगर, भालेराव नगर आणि आर. के. नगर परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे होऊनही काही बाधित कुटुंबांची नावे किराणा किटच्या यादीत समाविष्ट नसल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला. आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर संबंधित बाधितांची यादी तहसील प्रशासनाकडे सादर करण्यात आली असून पंचनामा झालेल्या पात्र नागरिकांना पुढील दोन दिवसांत किराणा किटचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूषण भदाणे यांच्या पाठपुराव्यामुळे यादीतून वगळल्या गेलेल्या अनेक अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *