
देशभक्तीच्या जयघोषात अमळनेर दुमदुमले; ‘हर घर तिरंगा’ अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित नवीन मराठी शाळा तसेच साने गुरुजी कन्या हायस्कूल येथे तिरंगा रॅली, देशभक्तीपर गीते, भाषणे, चित्रकला व रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यात आली.
नवीन मराठी शाळा
लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित नवीन मराठी शाळेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी मुख्याध्यापकांच्या हस्ते राष्ट्रध्वज पूजन करून रॅलीला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज आणि देशभक्तीपर संदेशांचे फलक घेतले होते. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला. नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी आदर निर्माण करणे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश पोहोचविणे हा रॅलीचा मुख्य उद्देश होता. वड चौक, बडगुजर मंगल कार्यालय मार्गे मुख्य बाजारपेठेतून ही रॅली काढण्यात आली. शाळेच्या मैदानावर रॅलीचा समारोप झाला. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांनी विशेष कौतुक केले.
साने गुरुजी कन्या हायस्कूल
साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्येही १४ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते, तर मुख्याध्यापिका अनिता बोरसे प्रमुख उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात दिलीप पाटील यांनी तिरंगाच्या इतिहासातील विविध टप्प्यांवर प्रकाश टाकला. इयत्ता दहावी ‘ब’ मधील विद्यार्थिनी नेहा राकेश पाटील हिने ‘वंदे मातरम्’ या गीताच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाची माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण भारावून टाकले.
वैदर्भी पवार हिने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास उलगडून सांगितला, तर इयत्ता आठवी ‘ब’ मधील हिताक्षी भदाणे हिने प्रभावी देशभक्तीपर भाषण सादर केले. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती विद्यार्थिनींना दिली. अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील विविध क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून देत राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शाळेत रांगोळी, चित्रकला स्पर्धा आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश पाटील यांनी परिश्रम घेतले. या दोन्ही शाळांच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होत असून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शहरभर अनुभवायला मिळत आहे.

Leave a Reply