महसूल पथकाला चकवा देऊन पळविलेला वाळूचा ट्रॅक्टर सापडला झुडपात

अमळनेर (प्रतिनिधी) : अवैध गौण खनिज वाहतूक करताना ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाला चकवा देऊन पळून गेलेला सबगव्हाण येथील ट्रॅक्टर अखेर एकलहरे शिवारातील झाडाझुडपात सापडला. महसूल पथकाने ट्रॅक्टरसह अर्धा ब्रास वाळू असा एकूण २ लाख ६३ हजार १२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सागर रवींद्र पाटील (रा. सबगव्हाण) याच्याविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे व तहसीलदार उमा ढेकळे यांच्या आदेशाने ग्राम महसूल अधिकारी विकेश अशोक भोई, विक्रम हरचंद कदम व दीपक बन्सीलाल पाटील हे ७ सप्टेंबर रोजी पहाटे मारवड हद्दीत गस्त घालत होते. पहाटे पाडसे रेल्वे स्थानकाजवळ निळ्या रंगाचा ट्रॅक्टर अर्धा ब्रास वाळूची वाहतूक करताना पथकाला आढळून आला. पथकाने चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने सागर रवींद्र पाटील (रा. सबगव्हाण) असे सांगितले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पथकाला न जुमानता अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर तेथून पळवून नेला. दरम्यान, पथकाने दिवसभर गस्त सुरू ठेवली असता दुपारी १ वाजेच्या सुमारास एकलहरे गावाच्या शिवारातील झाडाझुडपात पळून गेलेला ट्रॅक्टर आढळून आला. पथकाने ट्रॅक्टर व त्यातील अर्धा ब्रास वाळू जप्त केली. वाळूची किंमत १३ हजार १२७ रुपये, तर ट्रॅक्टरची किंमत २ लाख ५० हजार रुपये असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ६३ हजार १२७ रुपये आहे.

याप्रकरणी सागर रवींद्र पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ३०३ (२) व २१८ प्रमाणे मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *