विज्ञान नाट्योत्सवात पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलचा तालुक्यात डंका; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अमळनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे शाळेच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेचे आयोजन पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथील रोटरी क्लब हॉलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी गणित-विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच विज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील आठ शाळांनी या विज्ञान नाट्योत्सवात सहभाग नोंदविला. विज्ञान विषयातील संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत अभिनव व प्रभावी पद्धतीने पोहोचविणे, त्यांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड, जिज्ञासा, आकर्षण आणि संशोधनवृत्ती निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, नाट्यसादरीकरण तसेच विज्ञानविषयक संकल्पनांची उत्कृष्ट मांडणी करत परीक्षकांची दाद मिळवली. त्यांच्या या सादरीकरणाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला असून, आता हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या नाटकासाठी भाऊसाहेब देशमुख व दिनेश नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेनंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या विजयी संघात दिक्षिता भामरे, स्वरा कासार, विधी पाटील, परिणीती शिंदे, कुणाल बोरसे, प्रणाली सैंदाणे, पुष्करा राजपूत, मयंक राजपूत व आरुषी महाजन या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या.

या संघाला विज्ञान शिक्षिका स्वाती माळी यांनी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. अभिनयातील बारकावे, नाट्यसादरीकरणाची पद्धत तसेच विज्ञानविषयक संकल्पनांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, तसेच डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, श्रावण पाटील, व्ही. पी. बडवे यांच्यासह समस्त शिक्षकवृंद व केंद्र कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींकडून विजयी संघाचे अभिनंदन होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *