पिंपळे नाला अतिक्रमणप्रकरणी भूषण भदाणेंचे आमरण उपोषण मागे; ६ ऑक्टोबरला प्रशासकीय बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील पिंपळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावर कथित अतिक्रमण व अरुंदीकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) अमळनेर प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण सायंकाळी प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेतले. आमदार अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

पिंपळे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहाची संयुक्त मोजणी करून मूळ हद्द व नैसर्गिक रुंदी निश्चित करावी, कथित अतिक्रमणाचा पंचनामा करावा तसेच अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भूषण संजय भदाणे यांनी केली होती. या मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनाला उपोषणाची पूर्वसूचना दिली होती. दरम्यान, उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून २ ऑक्टोबर रोजी भूषण संजय भदाणे यांना लेखी पत्र देण्यात आले. पिंपळे नाल्याच्या कथित अतिक्रमण व अरुंदीकरणाबाबत यापूर्वी नगरपरिषदेकडे निवेदने प्राप्त झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले असून, संबंधित प्रकरणात नगरपरिषदेकडून कार्यवाही सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील कार्यवाहीसाठी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्या दालनात संबंधित विभागांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवेदनातील मागण्यांबाबत प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भूषण संजय भदाणे यांनी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. दिवसभर प्रशासनाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळी आमदार अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. त्यानंतर लेखी आश्वासन मिळाल्याने भूषण संजय भदाणे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनाला नाल्यावरील अनधिकृत बांधकामाचे वस्तुनिष्ठ मोजमाप करण्याचे आदेश दिले असून, येणाऱ्या काळात नाला परिसरात कुठलेही अतिरिक्त बांधकाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याचेही सूचित केले. पिंपळे नाल्याची प्रत्यक्ष संयुक्त मोजणी, नैसर्गिक प्रवाह व हद्द निश्चिती तसेच कथित अतिक्रमणाबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही यावर ६ ऑक्टोबरच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. “नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित राहावा आणि या प्रकरणात नियमानुसार कार्यवाही व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार,” अशी भूमिका भूषण संजय भदाणे यांनी घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, नगरसेवक सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितू ठाकूर, ॲड. यज्ञेश्वर पाटील, भाजपाचे माजी शहराध्यक्ष उमेश वाल्हे, शीतल देशमुख, मार्केट संचालक समाधान धनगर, दीपक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, सुनील शिंपी, सनी गायकवाड, प्रवीण (गुड्डू) देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष आरिफ भाया, गोविंदा बाविस्कर, गणेश पाटील, कृष्णा शिंदे, विवेक पाटील,कुशल पाटील, भूषण लोहार आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *