पहाटे गौण खनिजाची अवैध वाहतूक; दोन ट्रॅक्टर महसूल पथकाच्या ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) सडावण बुद्रुक येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल पथकाने १ ऑक्टोबर रोजी पहाटे कारवाई केली. दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कीं, सडावण बुद्रुक येथे रात्रीच्या वेळी गुपचूप गौण खनिज वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तहसीलदार डॉ. उमा ढेकळे आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कारवाईसाठी पथक पाठविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे), जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी, शिरसाळे बुद्रुक), मुकेश देसले (ग्राम महसूल अधिकारी, पाडसे), भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, कळमसरे), कल्पेश कुवर (ग्राम महसूल अधिकारी, फाफोरे बुद्रुक), संदीप माळी (ग्राम महसूल अधिकारी, मांडळ), एम. आर. पाटील (ग्राम महसूल अधिकारी, जैतपीर), अमोल चक्रे (ग्राम महसूल अधिकारी, जवखेडे) यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, नितीन मनोरे आणि निलेश मोरे यांच्या पथकाने १ ऑक्टोबर रोजी पहाटे १ ते २ वाजेदरम्यान सडावण येथे गस्त घातली. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १९ डी. व्ही. ७६२६ हा ट्रॅक्टर तसेच रत्नापिंप्री येथील शांताराम बनगर पाटील यांच्या मालकीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळून आला. पहिल्या ट्रॅक्टरचे मालक मोतीलाल रमेश पाटील, रा. रत्नापिंप्री, ता. पारोळा असून दुसऱ्या ट्रॅक्टरवर सुनील खुशाल भिल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *