
अमळनेरच्या तनिष्का वाघची महाराष्ट्राच्या बाल आरोग्यमंत्रीपदी निवड
३४ जिल्ह्यांतील बालप्रतिनिधींच्या राज्यस्तरीय संसदेत नेतृत्वाची संधी; जळगाव जिल्ह्याचा मान वाढविला
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राज्यस्तरावर नेतृत्वाचा ठसा उमटवत अमळनेरचा मान उंचावला आहे. तालुक्यातील उदयनगर येथील तनिष्का वाघ हिची महाराष्ट्राच्या ‘बाल आरोग्यमंत्री’पदी निवड झाली आहे. पुणे येथे जागतिक बालदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बाल संसदेत तिला ही जबाबदारी सोपविण्यात आली. तिच्या या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय बाल संसदेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढविणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि त्यांना स्वतःच्या समस्या, अपेक्षा व हक्क मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील १०२ गावांतील बालकांनी सहभाग घेतला. राज्यातील सहा विभागांतून निवडलेल्या २२ बालप्रतिनिधींना राज्यस्तरीय बाल संसदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून बाल मुख्यमंत्री, बाल विधानसभा अध्यक्ष, बाल विरोधी पक्षनेता आणि विविध खात्यांचे बालमंत्री निवडण्यात आले. प्रत्यक्ष संसदीय कामकाजाच्या धर्तीवर पार पडलेल्या या संसदेत तनिष्का वाघ हिच्यावर बाल आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. बाल संसदेत शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, पोषण आणि बालसुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर बालप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. बालमंत्र्यांनी या प्रश्नांना उत्तरे देत बालकांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. बालकांना केवळ प्रेक्षक न ठेवता निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून बालप्रतिनिधींचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे बालप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांच्यासह विविध जिल्ह्यांतील आयोगाचे सदस्य तसेच यशदा आणि युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीला राज्यस्तरावर बाल आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची मिळालेली संधी अमळनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे. तनिष्का वाघ हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply