
प्रताप महाविद्यालयातील एनसीसी शिबिरात छात्र सैनिकांना दिले अग्निशमन प्रशिक्षणाचे धडे
अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयात एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन अमळनेरच्या वतीने आयोजित एनसीसी संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (सीएटीसी-२०९) उत्साहात सुरू असून छात्र सैनिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने कार्य करता यावे यासाठी अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातर्फे विशेष अग्निशमन प्रशिक्षण देण्यात आले.
प्रताप महाविद्यालयात दि. २० मे ते २९ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या शिबिरात दि. २६ मे रोजी आग विझविणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे तसेच अग्निसुरक्षेचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात अठ्ठेचाळीस महाराष्ट्र बटालियन धुळे, एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि पन्नास महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर येथील छात्र सैनिकांनी सहभाग नोंदविला आहे. प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तब्बल ३५६ छात्र सैनिक सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षणादरम्यान नगरपरिषद अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी छात्र सैनिकांना आगीचे प्रकार, आग विझविण्याच्या विविध पद्धती, सुरक्षेची खबरदारी आणि अग्निशमन साहित्यांची सविस्तर माहिती दिली. तसेच अग्निशमन विभागातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख आणि आकाश संदानशिव यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून आग नियंत्रण प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. त्यामुळे छात्र सैनिकांना आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यावे, याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. शिबिराचे संचालन एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानकी, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव, सेकंड ऑफिसर रोहन पाटील, सुभेदार गजेसिंग, प्रशिक्षण जेसीओ सुभेदार कुलदीप सिंग आणि परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ यांनी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांनी केले. हे प्रशिक्षण छात्र सैनिकांमध्ये शिस्त, तत्परता, आपत्कालीन जबाबदारीची जाणीव आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारे ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन अमळनेरच्या वतीने अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply