
प्रतिक जैन यांना ‘रोटरी कार्यगौरव’ व ‘रोटरी जीवन गौरव’ पुरस्कार
अमळनेर (प्रतिनिधी) रोटरीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण समाजसेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी नेतृत्वाची दखल घेत अमळनेर येथील रोटरी क्लब अमळनेरचे माजी अध्यक्ष तसेच रिषभ फर्निचरचे संचालक प्रतिक जैन यांना प्रतिष्ठेचा ‘रोटरी कार्यगौरव पुरस्कार’ आणि ‘रोटरी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. एकाच मंचावर मिळालेल्या या दुहेरी सन्मानामुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रोटरी जिल्ह्यातील उल्लेखनीय, प्रभावी आणि निःस्वार्थ सेवाकार्याबद्दल प्रतिक जैन यांना ‘रोटरी कार्यगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच जळगाव जिल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची आणि रोटरीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टारतर्फे त्यांना ‘रोटरी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा दुहेरी सन्मान त्यांच्या समाजसेवेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे माजी प्रांतपाल तथा उमरेदचे आमदार संजय मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टारचे माजी अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सहाय्यक प्रांतपाल ॲड. सागर चित्रे, नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षल परदेशी, क्लब सचिव (प्रशासन) अनमोल मलिक, क्लब सचिव (प्रकल्प) हर्षल देशमुख, माजी अध्यक्ष विपुल पटेल, माजी क्लब सचिव हितेश सुराणा तसेच संस्थापक सदस्य सागर मुंदडा उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे सहाय्यक प्रांतपाल पूनम कोचर, रोहित संघवी, माजी अध्यक्ष देवेंद्र कोठारी तसेच सदस्य राजेश बेदमुथा यांनीही उपस्थित राहून प्रतिक जैन यांच्या गौरवाचा आनंद व्यक्त केला. प्रतिक जैन यांनी रोटरीचे ‘स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवत समाजहितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विशेषतः महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या मॅमोग्राफी व्हॅन प्रकल्पाचे त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. याशिवाय जिल्हा स्तरावरील सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग, उत्कृष्ट नियोजन, प्रभावी नेतृत्व आणि समाजाप्रती असलेली निस्वार्थ बांधिलकी यामुळे त्यांनी रोटरीसह समाजातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रतिक जैन यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून अमळनेर शहर, रोटरी क्लब अमळनेर आणि समाजसेवेला वाहून घेतलेल्या प्रत्येक रोटेरियनसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, व्यावसायिक आणि रोटरी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply