
धान्य वितरणास मुदतवाढ द्या; स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची शासनाकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी ) शासनाकडून धान्य पुरवठ्यात झालेल्या विलंबाचा फटका स्वस्त धान्य दुकानदारांना बसत असून जून २०२६ महिन्याच्या धान्य वितरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, अमळनेर यांनी केली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे निवेदन सादर करून दुकानदारांना दिलासा देण्याची विनंती केली आहे.
संघटनेचे शहराध्यक्ष दिलीप राधामल सैनानी व तालुकाध्यक्ष प्रविण रामपुरी गोसावी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शासनाच्या परिपत्रकानुसार मे व जून २०२६ या महिन्यांचे अन्नधान्य १५ जून २०२६ पर्यंत लाभार्थ्यांना वितरित करणे अपेक्षित होते. मात्र एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संबंधित महिन्यांचे धान्य वेळेत स्वस्त धान्य दुकानांवर उपलब्ध झाले नाही. प्रत्येक महिन्याचे धान्य उशिराने प्राप्त झाल्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत वितरण पूर्ण करणे दुकानदारांना शक्य झाले नाही. विशेषतः जून महिन्याचे धान्य अनेक दुकानांवर वेळेत पोहोचले नसल्याने लाभार्थ्यांना नियोजित कालावधीत धान्य वाटप करण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. शासनाने वेळेत पुरवठा न करता वितरणाची जबाबदारी दुकानदारांवर टाकणे अन्यायकारक ठरेल, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जून २०२६ महिन्याच्या धान्य वितरणासाठी तातडीने मुदतवाढ जाहीर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, शासनाने तातडीने मुदतवाढ दिल्यास उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत धान्य वितरण सुरळीतपणे पूर्ण करता येईल, असा विश्वास स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने व्यक्त केला आहे.
धान्य पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे अडचणी
“शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत धान्य दुकानांवर द्वारपोच पुरवठा केला असता तर दिलेल्या मुदतीत वितरण करणे दुकानदारांसाठी सहज शक्य झाले असते. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुदतवाढीची गरज भासली नव्हती. मात्र यावेळी धान्य पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासन शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
– प्रविण गोसावी, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, अमळनेर

Leave a Reply