
अमळनेर तालुक्यात २० जून उलटला तरी पावसाचा पत्ता नाही; कापूस वाचवण्यासाठी टँकरचा आधार, शेतकरी चिंतेत
अमळनेर (प्रतिनिधी) संत तुकाराम महाराजांच्या “आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना” या ओळींची प्रचिती सध्या तालुक्यातील चिमणपुरी, पिंपळे, वाघोदा, मंगरूळ, आर्डी, अनोरे, जवखेडा, शिरसाळे, अटाळे व ढेकू सिम परिसरातील शेतकऱ्यांना येत आहे.
अमळनेर तालुक्यात २५ मे रोजी विहिरींमधील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करण्यात आली. मात्र लागवडीनंतर २० ते २५ दिवस उलटूनही मान्सूनने अद्याप दमदार हजेरी लावलेली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जून महिन्याचे वीस दिवस उलटून गेले तरी पावसाची सुरुवात न झाल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. वाढत्या उष्णतेमुळे परिसरातील अनेक विहिरींनी तळ दाखवण्यास सुरुवात केली असून पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे नव्याने उगवलेल्या कापूस पिकासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पीक वाचवण्यासाठी अनेक शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून सिंचन करत आहेत. मात्र यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून आर्थिक ताणही वाढत आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील अनेक शेतकऱ्यांची पेरणी अद्याप रखडलेली आहे. पाऊस कधी येणार, पेरणी कधी करायची आणि कोणते पीक घ्यायचे, या प्रश्नांनी शेतकरी संभ्रमात आहेत. सोयाबीन, बाजरी, मका, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाऊस आणखी लांबल्यास कापूस पिकासह संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, “पाऊस पडेल तेव्हाच शेतीला जीवदान मिळेल,” अशी भावना व्यक्त होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा एकच प्रश्न सध्या चर्चेत आहे. “आकाश भरून येते, पण पाऊस कधी पडणार?” याच प्रश्नाचे उत्तर शोधत शेतकरी आजही आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

Leave a Reply