
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत, अनुदान मंजुरीची मागणी
अमळनेर तालुका काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकरी सापडले अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे केळी, द्राक्ष व कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागवडीच्या क्षेत्रावर अनुदान मंजूर करावे, अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली असून यासंदर्भात उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अमेरिका व इजरायल विरुद्ध इराण अशी लढाई सुरू असून या संघर्षाचे परिणाम जगातील इतर देशांवरही व्यापक प्रमाणात होत आहेत. भारत किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात पाहिले असता जळगाव व नाशिक जिल्ह्यातील केळी, द्राक्ष, कांदा व भाजीपाला व्यापारावर मोठा परिणाम झालेला आहे. सद्यस्थितीत रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशांकडून केळी व द्राक्षांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या महिन्यात या फळांना चढ्या दराने भाव मिळत असतो. मात्र युद्ध परिस्थितीमुळे निर्यातीसाठी बंदरावर आलेले केळी, द्राक्ष व भाजीपाल्याचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने माल खरेदी करत आहेत. प्रतिक्विंटल २५०० रुपये दराने विकली जाणारी केळी सध्या १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने मागवली जात आहे. अशीच स्थिती द्राक्ष व कांद्याबाबतही आहे. केळी, द्राक्ष, कांदा व भाजीपाला ही पिके नाशवंत असल्याने ती दीर्घकाळ साठवून ठेवणे शक्य नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केळी, द्राक्ष व कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागवडीच्या क्षेत्रावर अनुदान मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. तसेच भारतासह इतर देशांतील व्यापारी, खेळाडू, पर्यटक व विद्यार्थी हे आखाती देशांत विमान सेवा खंडित झाल्याने अडकले असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारमधील आमदार व खासदार यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, मनोज पाटील, संदीप घोरपडे, पी. वाय. पाटील, प्रा. श्याम पवार, मगन वामन पाटील, बन्सीलाल भागवत, भगवान संधान शिव, के. व्ही. पाटील, हर्षल जाधव, कैलास पाटील, डॉ. रवींद्र पाटील, सुधाकर भैसे, पितांबर पाटील, सईद तेली, कुशल मिस्तरी, सुरेश लहू पाटील, विजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply