
अमळनेर येथील यशवंत क्लासेसमध्ये ‘कोण बनेल यशवंत?’ प्रश्नमंजूषा स्पर्धा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रतिमा वैद्य यांच्या यशवंत क्लासेसमध्ये कोण बनेल यशवंत? ही विज्ञान विषयक प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. विज्ञान विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढावी व त्यांची बौद्धिक क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले होते. पहिल्या दिवशी प्राथमिक व उपांत्य फेरी पार पडली. दुसऱ्या फेरीत प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचे संघ तयार करून त्यांना वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित नावे देण्यात आली. दिवसभर चाललेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी चातुर्य, वेगवान विचारशक्ती व अचूक उत्तरे देत उपस्थितांची दाद मिळवली. दुसऱ्या दिवशी अंतिम फेरी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. तीनही फेऱ्या अत्यंत उत्कंठावर्धक ठरल्या. विज्ञानातील विविध घटक, शोध, संकल्पना व सामान्य ज्ञान यांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धकांनी आत्मविश्वासाने उत्तरे देत आपली तयारी सिद्ध केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे होते. प्रमुख अतिथी म्हणून पी. बी. ए. इंग्रजी माध्यम विद्यालयाचे मुख्याध्यापक जिजाबराव देवरे, प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. ललित मोमाया उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान विषय केवळ पाठांतरापुरता मर्यादित न ठेवता प्रयोगशील दृष्टिकोनातून शिकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. क्लासमध्ये विज्ञान विषयाबाबत विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असून या प्रश्नमंजूषा स्पर्धेचे कौतुक होत आहे. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक प्रदान करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रतिमा वैद्य व सहकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेचा निकाल असा
प्रथम क्रमांक : सेल मेम्ब्रेन गट (९ वी – पूर्वा पाटील, ८ वी – विराज पाटील, रिया पाटील). द्वितीय क्रमांक : न्यूक्लियस संघ (९ वी – तनय पाटील, ८ वी – मोहक साळुंखे, दर्शन पाटील), तृतीय क्रमांक : मायटोकॉन्ड्रिया समूह (९ वी – उमंग जाधव, ८ वी – पार्थ पाटील, लोकेश पाटील).

Leave a Reply