
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवारांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा : सभापती अशोक पाटील
शेतकरी रूपातील स्मारक उभारणी पूर्णत्वास
अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (कृउबा) आवारात उभारण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी दिली. मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
अजित पवार यांचे अमळनेरशी विकासाचे घट्ट नाते जुळले होते. आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील तसेच माजी नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून अमळनेरच्या विकासकामांना गती मिळाली. त्या योगदानाच्या स्मरणार्थ शेतकरी रूपातील पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.
असे असेल अजितदादांचे स्मारक
बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर चौथऱ्यावर बैलगाडी व त्यावर शेतकरी रूपातील अजित पवार यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासोबत धान्य कापणारा व धान्याचे पोते उचलणारा शेतकरी अशा प्रतिकात्मक मूर्ती असतील. या स्मारकाची एकूण उंची सुमारे १५ फूट असेल, तर अजितदादांचा पुतळा त्यांच्या प्रत्यक्ष उंचीइतकाच साकारण्यात येणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी अजित पवारांच्या स्मारकाची मागणी होत असताना अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात पहिली पुढाकार घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हे स्मारक शेतकऱ्यांना तसेच अमळनेर तालुक्यातील जनतेला प्रेरणा, धाडस आणि ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास सभापती अशोक पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा ही होणार सत्कार
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार स्मिता वाघ यांच्या सहकार्याने, उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी व गुमास्ता यांच्या संयुक्त प्रयत्नातून अमळनेर बाजार समितीने प्रगतीची झेप घेतली आहे. शिस्तबद्ध व पारदर्शक कारभारामुळे बाजार समितीत आवक वाढली असून जिल्ह्यात अव्वल स्थान मिळाले आहे.
पणन विभागाच्या कर्जाची नियमित परतफेड, सुपरव्हिजन फी व अंशदान वेळेवर भरल्यामुळे बाजार समितीला ५ टक्के व्याजदराने सुमारे सहा लाख रुपयांचा बोनस प्राप्त झाला आहे. या बोनस मधून मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक सभेत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही सभापतींनी दिली.
विकासकामांचे होणार उद्घाटन
बाजार समिती आवारात १३६ दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरू असून लेखापाल कार्यालय पूर्ण झाले आहे. पातोंडा उपबाजारात वे-ब्रिज उभारण्यात आले आहे. बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. मारवड उपबाजार समितीत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या सर्व विकासकामांचे उद्घाटन वार्षिक सभेत करण्यात येणार आहे.
नवीन कामांचे भूमिपूजन
शेतकरी भवन, हमाल-मापाडी भवन तसेच व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेडचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आगामी उन्हाळ्यात लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत थंड पेय, तर हिवाळा व पावसाळ्यात मोफत चहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “ज्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती चालते, त्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे अशोक पाटील यांनी नमूद केले.

Leave a Reply