सर्प पकडताना सर्पमित्रालाच कोब्राचा दंश; धुळ्यात उपचारासाठी केले दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील ताडेपुऱ्यात सर्प पकडण्याचा प्रयत्न करत असताना प्रसिद्ध सर्पमित्र विकास राजेन्द्र धनगर (वय २२) यांना कोब्रा जातीच्या विषारी सर्पाने हाताला दंश केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी घडली. सर्पदंशानंतर त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास राजेन्द्र धनगर यांच्या घरातील गाद्या ठेवण्याच्या घडोशीवर गोधडीखाली सर्प असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्पमित्र असल्याने त्यांनी गोधडी उचलून सर्पाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी सर्पाने त्यांच्या हाताला दंश केला.

सर्पदंश झाल्यानंतरही विकास धनगर यांनी घाबरून न जाता शिताफीने त्या विषारी सर्पाला पकडून बरणीत बंद केले. सर्प कोब्रा जातीचा असल्याने त्याला सोबत घेऊन त्यांनी तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालय गाठले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. जि. एम. पाटील यांनी विकास धनगर यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, पुढील काळात त्यांना कृत्रिम श्वसनयंत्राची आवश्यकता भासण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णवाहिकेने त्यांना धुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. विकास राजेन्द्र धनगर हे अमळनेर परिसरातील प्रसिद्ध सर्पमित्र असून त्यांनी आतापर्यंत अनेक सर्पांना पकडून त्यांना जीवदान दिले आहे. इतरांचा जीव वाचविण्यासाठी नेहमी धावून जाणाऱ्या सर्पमित्रालाच सर्पदंश झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *