
पिळोदा येथून अल्पवयीन भाऊ-बहिण बेपत्ता ; पाडळसरेतील तरुणही हरवला
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील पिळोदा येथून अल्पवयीन भाऊ- बहिणीला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची घटना २१ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पंडित सुकलाल भिल हे २१ मे रोजी पत्नीसमवेत मांजरोद (ता. शिरपूर) येथे नवविवाहित पुतणसून आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची बालाजी विद्यालय, गांधली-पिळोदा येथे आठवीत शिक्षण घेणारी १५ वर्षे ५ महिने १८ दिवस वयाची मुलगी आणि शेजारी राहणारा दहावीत शिकणारा १७ वर्षे ९ महिने २९ दिवस वयाचा सख्खा पुतण्या हे दोघे घरातून बेपत्ता झाल्याची माहिती पुतण्या निलेश याने दिली.
दोघांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते आढळून न आल्याने अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
दरम्यान, तालुक्यातील पाडळसरे येथील रवींद्र गोकुळ सोनवणे (वय २५) हा बांधकाम मजुरी करणारा तरुणही बेपत्ता झाला आहे. आईने कामाचा हिशोब विचारल्यानंतर तो २२ मे रोजी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडला, मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. याप्रकरणी आईने मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply