
अमेरिकन हिप अँड नी सर्जन्स संघटनेचे सदस्यत्व; अमळगावच्या डॉ. संदीप पाटील यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथील सुपूत्र तथा प्रसिद्ध सांधेरोपण व स्पोर्ट्स सर्जन डॉ. संदीप सुरेश पाटील यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ हिप अँड नी सर्जन्स’ या संघटनेचे सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले आहे. 
यासाठी डॉ. पाटील यांना त्यांचे मार्गदर्शक डॉ. आर्थर मलकानी, चीफ ऑफ ॲडल्ट रिकन्स्ट्रक्शन व फेलोशिप डायरेक्टर फॉर जॉइंट रिप्लेसमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ लुईव्हिल, केंटकी (यूएसए) तसेच डॉ. सव्यसाची ठक्कर, डिपार्टमेंट ऑफ आर्थ्रोप्लास्टी, हिप अँड नी सर्जरी, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, बाल्टिमोर (यूएसए) यांनी शिफारस केली. डॉ. पाटील यांनी सन २००८-०९ मध्ये डॉ. आर्थर मलकानी यांच्या मार्गदर्शनाखाली फेलोशिप पूर्ण केली होती. याशिवाय डॉ. संदीप पाटील यांची ‘इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जन्स’ या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. दि. १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना सदस्यत्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचा सदस्यत्व क्रमांक पी-०१-१३२ असा आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सी. खिंचा व सचिव डॉ. लिओ जोसेफ यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. संदीप पाटील हे डी.एन.बी. ऑर्थो व डिप्लोमा ऑर्थो पदवीधारक असून सांधेरोपण व स्पोर्ट्स इंज्युरी शस्त्रक्रियेत तज्ज्ञ आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील सदस्यत्वामुळे अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. पाटील यांनी या यशाचे श्रेय आपले गुरू डॉ. मलकानी व डॉ. ठक्कर यांना देत कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ. संदीप पाटील हे सध्या मुंबई (बोरीवली) येथे सेवारत असून अमळनेर तालुका मराठा समाजाचे माजी सचिव कै. सुरेश रामकृष्ण सोनवणे (अमळगाव) यांचे ते सुपूत्र आहेत.

Leave a Reply