
गायत्री बोरसेची ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’साठी निवड, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम
अमळनेर (प्रतिनिधी) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावून साने गुरुजी कन्या हायस्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गायत्री धनराज बोरसे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ या उपक्रमासाठी तिची निवड झाली असून, या माध्यमातून तिला विभागीय विज्ञान केंद्राला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळणार आहे.
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये गायत्री शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि संशोधनवृत्तीला चालना मिळावी, यासाठी ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना नागपूर, मुंबई किंवा पुणे येथील विभागीय विज्ञान केंद्राला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी दिली जाते. अमळनेर तालुक्यातून गायत्री बोरसे हिने या उपक्रमासाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
गायत्रीला विज्ञान प्रकल्पासाठी शाळेचे विज्ञान शिक्षक दीपक रामभाऊ महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब हेमकांत पाटील, सचिव दादासाहेब संदीप घोरपडे, संस्थेचे संचालक मंडळ, साने गुरुजी कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. ए. धनगर, ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील, दिलीप पाटील, मुकेश पाटील आणि आर. एम. देशमुख यांनी तिचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गायत्रीच्या या निवडीमुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

Leave a Reply