जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार! हार, शाल, बुके नको; शेतकरी राजाला मदतीचा हात द्या

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी संकटात असताना वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन जळगाव जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी नगराध्यक्षा जयश्रीताई अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

आज २५ नोव्हेंबर रोजी जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, यंदा तालुक्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त हार, शाल अथवा बुके न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी गरजू शेतकऱ्यांना मदत, अन्नदान, पाणीवाटप, आरोग्य शिबिर यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत संकटातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *