
अमळनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी, शहरातून काढली भव्य शोभयात्रा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाडी चौक येथून गाडगे बाबांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे पूजन करून शहरातून भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली.
या मिरवणूक मार्गावर दिपक वाल्हे अनिल वाघ, रवींद्र जाधव, लक्ष्मण परदेशी यांनी रांगोळी काढून परिसर सुसोभीत केला. टाळ-मृदंगाच्या गजरात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात संपूर्ण समाजबांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक मार्गे गाडगेबाबा उद्यानापर्यंत ही मिरवणूक पार पडली. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत भाविकांनी अभिवादन केले.
राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारकाजवळ आरती व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्रिकोणी बगीचा परिसरातील गाडगेबाबा उद्यानात सामूहिक आरतीने वातावरण भक्तिमय झाले. परदेशी धोबी समाजातर्फे महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी परीट धोबी समाज अमळनेरचे आजी-माजी पदाधिकारी, युवा परिट धोबी समाज मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. सुभाष पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, नगरसेवक रामकृष्ण पाटील, जयश्रीताई अनिल पाटील, अशोक बिऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते सुरज परदेशी, विक्रांत पाटील, नाना धनगर, मनोहरनाना पाटील, अरुण देशमुख आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली. गाडगेबाबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन स्वच्छ, सुजाण आणि सुसंस्कृत समाज घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. भक्तीभाव, शिस्त आणि सेवाभावाचा संगम ठरलेला हा सोहळा अमळनेरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, यात शंका नाही.

Leave a Reply