रुग्णांना जीवदान देणारी रुग्णवाहिका त्या रात्री एका मुक्या जीवासाठी धावली !

अमळनेरच्या रुग्णवाहिका चालकाने जखमी गर्भवती हरणीला दिले जीवदान

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चोपडी कोंडावळ आणि डांगर दरम्यानच्या रस्त्यावर वाहनाच्या धडकेत जखमी गर्भवती हरणीला खासगी रुग्णवाहिका चालकाने माणुसकी दाखवून जीवदान दिले. खरे तर रुग्णांना जीवदान देणारी रुग्णवाहिका त्या रात्री एका मुक्या जीवासाठी धावली.  माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरलेली ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील खासगी रुग्णवाहिका चालक आकाश पाटील हे रुग्णाला धुळे येथे सोडून आपल्या रुग्णवाहिकेसह अमळनेरकडे परतत होते. रात्रीच्या सुमारास चोपडी कोंडावळ आणि डांगर दरम्यानच्या रस्त्यावर त्यांना एक हरीण रक्ताळलेल्या अवस्थेत पडलेले दिसले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेली ती हरणी रस्त्याच्या कडेला वेदनेने तडफडत होती. त्या मुक्या जीवाची अवस्था पाहून आकाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली रुग्णवाहिका थांबवली. जवळ जाऊन पाहिले असता ती हरणी गर्भवती असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले.

क्षणाचाही विचार न करता त्यांनी त्या जखमी हरणीला काळजीपूर्वक आपल्या रुग्णवाहिकेत उचलून घेतले आणि थेट अमळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याकडे धाव घेतली. दवाखान्यातील डॉक्टरांनीही तातडीने उपचार सुरू केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे हरणीचे तसेच तिच्या पोटातील पिलाचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी देसले यांनी आकाश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे विशेष कौतुक केले. माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती देणारी ही घटना परिसरात भावनिक वातावरण निर्माण करून गेली. रुग्णांना जीवदान देणारी रुग्णवाहिका त्या रात्री एका मुक्या जीवासाठी धावली आणि एका नव्या जीवाचेही रक्षण झाले. अमळनेरमध्ये माणुसकीचा हा दीप आज अधिक तेजाने उजळला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *