
वीज कनेक्शन न दिल्याच्या कारणावरून तरुणाला आठ जणांकडून मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायतीच्या विहिरीजवळील डीपीवरून वीज कनेक्शन न दिल्याच्या कारणावरून आठ जणांनी एकाला लोखंडी रॉड, मोटरसायकलच्या शॉकअप व काठीने मारहाण केल्याची घटना २९ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अमळगाव येथील अन्नपूर्णा हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी रवींद्र संजय वाल्हे (रा. अमळगाव) यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रवींद्र संजय वाल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील ग्रामपंचायतीत शिपाई आहेत. २९ रोजी सकाळी १० वाजता रवींद्र व त्यांचे वडील अन्नपूर्णा हॉटेलजवळ उभे असताना जळोद येथील हिरालाल वाल्मिक कोळी याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ आपली बोअरवेल असल्याचे सांगून विहिरीजवळील डीपीवरून वीज कनेक्शन देण्याची मागणी केली. त्यावर संजय वाल्हे यांनी ती डीपी ग्रामपंचायतीची असल्याने वीज कनेक्शन देता येणार नसल्याचे सांगितले. त्यावेळी हिरालाल कोळी याने “तुला पाहून घेऊ” अशी धमकी देऊन तेथून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता हिरालाल वाल्मिक कोळी, हिरालाल नागो कोळी, मुन्ना कोळी, राज कोळी, मनोज कोळी, अल्ताफ खाटीक, गणेश कोळी आणि आकाश उर्फ भाचा कोळी हे अन्नपूर्णा हॉटेलजवळ आले. त्यांनी रवींद्र यांना त्यांचे वडील कुठे गेले, अशी विचारणा केली. ते अमळनेरला गेल्याचे सांगितल्यानंतर हिरालाल वाल्मिक कोळी याने हातातील लोखंडी रॉड रवींद्र यांच्या पाठीवर मारला. मुन्ना कोळी याने मोटरसायकलच्या शॉकअपने त्यांच्या कमरेवर, तर राज कोळी याने काठीने पाठीवर मारहाण केली. अल्ताफ खाटीक हा हातात लोखंडी रॉड घेऊन “याचे हातपाय तोडून टाका” असे सांगत होता, तर गणेश कोळी व आकाश उर्फ भाचा कोळी यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रवींद्र पळू लागल्यानंतर आरोपींनी त्यांच्या दिशेने विटा फेकल्या. त्यानंतर त्यांनी पाठलाग करून पुन्हा मारहाण करण्यासाठी रवींद्र यांना अडवले. यावेळी नागरिकांनी त्यांची सुटका केली. त्यानंतर ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर मारवड पोलिसांचे वाहन घटनास्थळी आले आणि रवींद्र यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), ३२४(२), ३५१(२), ३५२ व ११५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ए. एस. आय. संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply