
१७ फुटबॉल संघांच्या चुरशीच्या लढती; शालेय क्रीडा स्पर्धेत विजेत्यांची जिल्हास्तरावर धडक
अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती, शिक्षण विभाग अमळनेर व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल, मारवाड रोड, अमळनेर येथे शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तालुक्यातील १७ फुटबॉल संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. चुरशीच्या व अटीतटीच्या लढतींमुळे संकुल परिसर क्रीडामय झाला होता. अनेक सामने अतिरिक्त वेळेत गेले आणि त्यानंतर पेनल्टी शूटआउटद्वारे निकाल लागल्याने स्पर्धेतील रंगत वाढली.
स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा व खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लाडगे, अमळनेर पोलीस अधिकारी व क्रिकेट अष्टपैलू खेळाडू समाधान गायकवाड, अर्बन बँकेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अभिषेक पाटील, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, पोलीस अधिकारी मयुर पाटील आणि तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या हस्ते फुटबॉल व मैदानाचे पूजन करून तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर तसेच पंच अर्शद शेख, सागर चावरिया, अल्तमश सैय्यद, लकी चावरिया आणि जय जाधव यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. उद्घाटनानंतर विविध गुणवंत खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे पोलीस अधिकारी समाधान गायकवाड यांनी आपल्या भाषणात खेळाडूंनी मेहनत करून क्रीडा क्षेत्रात यश संपादन करावे, शासकीय सेवेत जावे आणि देशसेवा करावी, असे सांगितले. वसुंधरा लाडगे यांनी खेळाडू हा शिस्तबद्ध असतो, असे सांगत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच ‘हारी बाजी को जीतना हमे आता है..’ या गीताचे तालासुरात सादरीकरण करून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
१४ वर्षे मुले गटात स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर विजेता, तर सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ उपविजेता ठरला. १४ वर्षे मुली गटात ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर विजेता, तर स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर उपविजेता ठरला. १७ वर्षे मुले गटात सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ विजेता, तर स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर उपविजेता ठरला. १७ वर्षे मुली गटात स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर विजेता, तर ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर उपविजेता ठरला. १९ वर्षे मुले गटात रॉयल उर्दू स्कूल ॲड. ज्युनिअर कॉलेज, अमळनेर विजेता ठरला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील गोकुळ बोरसे, सुनिल करंदीकर, विनायक सूर्यवंशी, विनोद पाटील, योगेश पाटील, जय जाधव, सागर चावरिया, अर्शद शेख आणि दर्शन पाटील यांनी सहकार्य केले. विजयी संघांना शुभेच्छा देण्यात आल्या. हे विजयी संघ १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान भुसावळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Leave a Reply