
अमळनेर नगरपालिकेचा अजब कारभार, मृतदेह घंटागाडीतून नेणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा कंत्राटासाठी ठरवले पात्र!
गुन्हा दाखल होऊनही एस.आर. ग्रीनवे एम्पायरचा आर्थिक लिफाफा उघडला; इतर दोन संस्था अपात्र, निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

अमळनेर (प्रतिनिधी) बेवारस मृतदेह कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून नेल्याच्या गंभीर प्रकरणात ज्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला, त्याच ठेकेदाराला अमळनेर नगरपरिषदेच्या नव्या घनकचरा संकलनाच्या ई-निविदेत पुन्हा पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप होत आहे. एस.आर. ग्रीनवे एम्पायर, नाशिक या संस्थेचा आर्थिक लिफाफा उघडण्याची प्रक्रिया पुढे गेल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, निविदेत सहभागी झालेल्या इतर दोन संस्थांना अपात्र ठरविण्यात आल्याने ‘ज्याच्यावर गुन्हा दाखल, त्यालाच पुन्हा कंत्राटाची संधी?’ असा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण निविदा प्रक्रियेत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचाही आरोप केला जात असून, त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ जून २०२६ रोजी नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराला बजावलेल्या नोटिसीत कंत्राटातील अटी-शर्तींचा भंग, कर्तव्यात गंभीर कसूर, कचरा संकलनातील दिरंगाई तसेच बेवारस मृतदेहासाठी स्वतंत्र व स्वच्छ वाहनाची व्यवस्था न करता नगरपरिषदेच्या घंटागाडीतून मृतदेह नेल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. खुलासा असमाधानकारक ठरल्यास अनामत रक्कम जप्त करणे, दंड वसूल करणे, काळ्या यादीत टाकणे आणि कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला होता. ठेकेदाराने खुलाशात रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध न झाल्याने घंटागाडी स्वच्छ धुऊन आणि निर्जंतुकीकरण करून मृतदेह अंत्यविधीसाठी नेल्याचे सांगितले होते. त्यानंतर ठेकेदार रामदास बाळू पवार, सुपरवायझर राजेंद्र गोलाईत आणि संबंधित घंटागाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मृतदेहांच्या विल्हेवाटीची जबाबदारी असलेले स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचेही समोर आले होते.
एका बाजूला संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याच्या कामकाजावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला नव्या ई-निविदेत त्याच संस्थेला पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप आहे. नवीन निविदेत एकूण पाच संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील सृष्टी एंटरप्रायजेस, नितीन डी. कदम हॉस्पिटॅलिटी एलएलपी प्रा. लि., नाशिक येथील एस.आर. ग्रीनवे एम्पायर, पुणे येथील व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. आणि दिशा एजन्सी यांचा समावेश होता. यापैकी सृष्टी एंटरप्रायजेस, एस.आर. ग्रीनवे एम्पायर आणि व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस या तीन संस्था तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्याची माहिती आहे, तर नितीन डी. कदम हॉस्पिटॅलिटी एलएलपी आणि दिशा एजन्सी या दोन संस्था अपात्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या निविदेत घराघरांतून घनकचरा संकलन, कचऱ्याची वाहतूक, गाळ व बांधकाम कचऱ्याची विल्हेवाट, मृत जनावरांची विल्हेवाट, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार आणि ओला-सुका कचरा प्रक्रिया अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे निविदेतील पात्रता निकष, अपात्र ठरविण्यात आलेल्या संस्थांची कारणे आणि तांत्रिक मूल्यमापनाची प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदाराला पात्र ठरविण्यासाठी कोणते निकष लावण्यात आले, याबाबत पालिका प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी होत आहे.
जुन्या ठेकेदारालाच पुन्हा कंत्राट मिळावे यासाठी पालिकेतील काही सत्ताधारी नगरसेवक आणि अधिकारी प्रयत्न करीत असून, त्यामागे आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा गंभीर आरोपही केला जात आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील पात्रता तपासणी, अपात्र ठरविलेल्या निविदाकारांची कारणे, तांत्रिक मूल्यमापन अहवाल, पात्रता समितीचे निर्णय आणि आर्थिक लिफाफा उघडण्यासंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करून संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, दि. २७ जून रोजी दैनिक दिव्य मराठीने ‘दफनविधीसाठी बेवारस मृतदेह नेला चक्क घंटागाडीतून!’ या मथळ्याखाली हे प्रकरण उजेडात आणले होते. त्यानंतर पालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावली, खुलासा मागविला आणि पुढे ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, आता त्याच संस्थेला नव्या घनकचरा कंत्राटाच्या निविदेत पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप होत असल्याने पालिकेच्या आधीच्या कारवाईचा आणि नव्या निविदा प्रक्रियेचा परस्परसंबंध स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘क्लीन चिट’ कुणी दिली?
ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला नव्या निविदेत पात्र ठरविण्याचा निर्णय कोणत्या समितीने घेतला? गुन्हा दाखल असणे निविदेच्या पात्रतेत अडथळा ठरत नसेल, तर त्यासंबंधीचा शासन नियम कोणता? इतर ठेकेदार कोणत्या कारणांवर अपात्र ठरले? या प्रश्नांची कागदोपत्री उत्तरे नगरपरिषद प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी होत आहे.
निविदा प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास कारवाईचे निर्देश देणार
घनकचरा निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. बेवारस मृतदेह प्रकरणात संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची बाब गंभीर आहे. नव्या निविदेत संबंधित संस्थेला पात्र ठरविताना नियमांचे पालन झाले आहे का, याची माहिती घेण्यात येईल. निविदा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले जातील. डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष,अमळनेर नगरपरिषद
पात्रता निकष तपासूनच पुढील कार्यवाही केली जाईल
घनकचरा निविदेची प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार आणि निर्धारित पात्रता निकषांच्या आधारे राबविण्यात येते. निविदेत सहभागी झालेल्या संस्थांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र संस्थांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराविरुद्ध दाखल गुन्हा आणि निविदेतील पात्रता याबाबत लागू असलेल्या अटी व नियम तपासूनच पुढील कार्यवाही केली जाईल. निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
गणेश शिंदे,मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद
….अन्यथा वरिष्ठ स्तरावर दाद मागणार
“शहरातील घनकचरा व्यवस्थापनातील अनियमितता आणि बेवारस मृतदेहाची कचरा घंटागाडीतून वाहतूक झाल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या दोन्ही प्रकरणांबाबत वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही, ही खेदजनक बाब आहे. मृतदेहाची अवमानकारक वाहतूक करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदार व दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. प्रशासनाने सात दिवसांत लेखी खुलासा व कार्यवाही अहवाल द्यावा, अन्यथा वरिष्ठ स्तरावर दाद मागणार आहे. जनतेच्या प्रश्नांवर गप्प बसणार नाही.”
-देवेंद्र कांबळे, नगरसेवक

Leave a Reply