खान्देश साहित्य संघाकडून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांचा सहपत्नीक विशेष सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) राज्य शासनाने निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांच्या “काळ्या निळ्या रेषा” या साहित्यकृतीस “साहित्य अकादमी पुरस्कार” जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश साहित्य संघाच्या वतीने राजू बाविस्कर व त्यांच्या सहपत्नीचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना कलाशिक्षक राजू बाविस्कर म्हणाले, व्यवस्थेचे घाव पाठीवर काळ्या-निळ्या रंगाची आकृती काढून नामानिराळे जरी राहिले तरी ते काळजावर कायमचे कोरले जातात. गावकुसाबाहेर राहून सोसलेल्या प्रसंगांना कामी आलेली माणसे मात्र कायमची मनात घर करून राहतात. अशा वेळी काळ्या-निळ्या रेषा रेखाटताना सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी भावना निवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांनी व्यक्त केली. यावेळी खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष तथा प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष तथा गझलकार शरद धनगर, जिल्हा सचिव तथा ‘दै. सकाळ’चे तालुका बातमीदार उमेश काटे, जिल्हा उपाध्यक्ष रजनी पाटील, महिला संघटक रेखा मराठे-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विविध साहित्यिक विषयांवर चर्चा करण्यात आली.

राजू बाविस्कर यांनी आपल्या आत्मकथनातून शब्दांत जिवंत चित्र उभे केले आहे. वेदना देणाऱ्यांपेक्षा वेदनेवर फुंकर घालणारी माणसे स्मरणात राहतात. मनात वाईट आठवणींना थारा न देता चांगल्या आठवणी जपाव्यात, असा अनमोल संदेश त्यांनी दिला. त्यांनी लासूर (ता. चोपडा) येथील आपल्या बालपणातील अनेक आठवणी सांगितल्या. संततधार पावसात झोपड्या पूर्णपणे उध्वस्त झाल्या होत्या. सर्वत्र पाणी साचल्यामुळे घराला झिर फुटला होता. त्यामुळे रात्री मुलाबाळांसह अबालवृद्धांना झोपताही येत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत काहींनी गावातील राम मंदिर आमच्यासाठी खुले करून दिले. त्या मंदिरात मिळालेला आठ-दहा दिवसांचा आसरा आजही हृदयात माणुसकीची शिकवण देणारा आहे, असे त्यांनी सांगितले. लोकवर्गणीतून उभारलेला शिवरायांचा पुतळा ते पाटील वाड्यात घडलेल्या सकारात्मक घटनांचा उल्लेख करताना ते भावूक झाले. बाविस्कर यांच्या पहिल्याच साहित्यकृतीला मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्कारात त्यांच्या धर्मपत्नी भारती बाविस्कर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *