बोहरा येथे महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करत विनयभंग

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोहरा येथे ४५ वर्षीय महिलेला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बोहरा येथील ४५ वर्षीय महिला घराबाहेर शेजारणीशी बोलत असताना गावातील पवन शिवाजी पाटील हा तिथे आला आणि शिवीगाळ करू लागला. महिलेने त्याचा जाब विचारला असता तो धावून आल्याने महिला घाबरून घरात पळून गेली. त्यावेळी त्याने दरवाज्यावर हात मारत घरात घुसून डावा हात पकडत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत महिलेला चापट बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शेजाऱ्यांनी सदर महिलेची सुटका केली. महिलेचा पती घरी आल्यावर महिलेने मारवड पोलिस ठाणे गाठत पवन शिवाजी पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ संजय पाटील हे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *