मीडिया वृत्ताचा दणका; अमरधामातील विदारक वास्तवाची तातडीने दखल, सीसीटीव्ही व मुख्य प्रवेशद्वाराच्या कामांना आला वेग

अमळनेर (प्रतिनिधी) येथील चोपडा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधांमुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचे विदारक वास्तव खबरीलालसह विविध वृत्तमाध्यमांनी मंगळवारी प्रकाशझोतात आणताच नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या वृत्ताची गंभीर दखल घेत प्रशासनाने अमरधाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम तातडीने सुरू केले असून मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामालाही वेग देण्यात आला आहे.

खबरीलालने प्रकाशित केलेल्या वृत्तात अंत्यसंस्कारासाठी अपुरे सरण उपलब्ध होणे, स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा अभाव, तसेच अर्धवट जळालेल्या मृतदेहांची भटक्या कुत्र्यांकडून होत असलेली विटंबना यासारखे अत्यंत गंभीर मुद्दे मांडण्यात आले होते. या धक्कादायक प्रकारामुळे शहरभर संतापाची लाट उसळली होती. नागरिकांसह विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासांत नगरपरिषद प्रशासनाने हालचाली सुरू करत अमरधाम परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे काम हाती घेतले. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामालाही गती देण्यात आली आहे. प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था उभारण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याशिवाय स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याबाबतही प्रशासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

अमरधामसारख्या संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध होणे, मृत व्यक्तींचा सन्मान अबाधित राहणे आणि त्यांच्या नातेवाईकांना सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करता येणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. माध्यमांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने या वृत्ताचा सकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे. नागरिकांनीही ही कारवाई स्वागतार्ह असल्याचे सांगत अमरधामातील सर्व समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *