
मनगटावरची ‘टिक-टिक’ जपणारा शेवटचा कारागीर…; ३० वर्षांपासून काळालाच पुन्हा चालायला शिकवणारे अजीम मलिक
अमळनेर (प्रतिनिधी )एक काळ असा होता की, नवीन कपड्यांइतकाच नवीन घड्याळाचाही आनंद असायचा. प्रत्येकाच्या मनगटावर एक घड्याळ आणि प्रत्येक शहरात त्याला पुन्हा जीव देणारा एक कारागीर असायचा. काळ बदलला… मोबाईल हातात आला… स्मार्टवॉच मनगटावर आले… आणि घड्याळांची ‘टिक-टिक’ हळूहळू शांत होत गेली. पण अमळनेर बसस्थानक परिसरातील एका छोट्याशा टपरीत आजही एक माणूस वेळेचे थांबलेले काटे पुन्हा चालू करण्याचे काम निष्ठेने करत आहे. ते म्हणजे अजीम मलिक.
घड्याळं थांबतात… पण अजीम मलिक वेळ थांबू देत नाहीत!
गेली तब्बल ३० वर्षे अजीम मलिक घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय करत आहेत. बसस्थानकाजवळील त्यांची छोटीशी टपरीच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. एकेकाळी ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली ही टपरी आता दिवसातून एखाद-दुसऱ्या ग्राहकाचीच वाट पाहत असते.
“आजही अनेकांना त्यांच्या मनगटावरील घड्याळाशी भावनिक नातं आहे. ते बंद पडलं की नवीन घेण्यापेक्षा तेच दुरुस्त करून घालणं त्यांना आवडतं,” असे अजीम मलिक सांगतात. अवघ्या २० ते ३० रुपयांत ते बंद पडलेल्या घड्याळाला पुन्हा चालू करून देतात. एखाद्या जुन्या आठवणीला पुन्हा धडधडतं हृदय मिळाल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि त्यातच त्यांना आपल्या कामाचं खरं समाधान मिळतं.
दिवसभराच्या मेहनतीनंतर त्यांच्या हातात अवघे २०० ते २५० रुपये पडतात. कमाई कमी असली तरी कामावरील प्रेम मात्र तसूभरही कमी झालेले नाही. “हेच काम माझी ओळख आहे. याच व्यवसायावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो,” असे ते अभिमानाने सांगतात.
काळाच्या बदलत्या प्रवाहात शहरातील अनेक घड्याळ दुरुस्तीची दुकाने कायमची बंद झाली. नवीन पिढी मोबाईल आणि स्मार्टवॉचकडे वळली. मात्र अजीम मलिक अजूनही घड्याळाच्या प्रत्येक छोट्याशा पुर्ज्यात वेळेचा ठोका शोधत आहेत. त्यांच्या कुशल हातांनी आजही अनेकांची जुनी, जपलेली घड्याळे पुन्हा ‘टिक-टिक’ करू लागतात.
अजीम मलिक यांची ही छोटीशी टपरी केवळ घड्याळ दुरुस्तीचे दुकान नाही, तर बदलत्या काळातही परंपरा, कौशल्य आणि प्रामाणिक श्रम जिवंत ठेवणाऱ्या एका कारागिराचा संघर्ष आहे. मोबाईलच्या युगात वेळ पाहण्यासाठी घड्याळांची गरज कदाचित कमी झाली असेल, पण वेळेला पुन्हा चालायला शिकवणाऱ्या अशा कारागिरांची किंमत मात्र आजही तितकीच अमूल्य आहे.

Leave a Reply