माता-बाल आरोग्यासाठी ‘आधार’चा आरोग्य मित्रांना प्रशिक्षणातून कानमंत्र

अमळनेर (प्रतिनिधी) व्होल्कर्ट फाउंडेशन, मुंबई यांच्या सहाय्याने आधार संस्था, अमळनेरकडून शहरालगतच्या वस्त्यांमध्ये ‘आधार आरोग्य प्रकल्पा’ची नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत कार्यरत आरोग्य मित्र तसेच प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीत सहभागी होणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि एएनएम यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षणात माता-बाल आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गरोदरपणात घ्यावयाची काळजी, गरोदरपणातील आवश्यक तपासण्या, बाळंतपणानंतरचे चाळीस दिवस, जोखमीच्या गरोदर मातांमध्ये आढळणारी लक्षणे तसेच त्यावरील व्यवस्थापन याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण व वस्ती भागातील माता-बाल आरोग्य सेवांना अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रशिक्षण साधन व्यक्ती डॉ. आम्रपाली मुरार आणि ज्ञानेश्वर सोनवणे जपाईगो यांनी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाची उपयुक्तता स्पष्ट केली. कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच पूर्वी चौधरी, मुरलीधर बिरारी, दीपक संदानशिव आणि आनंद पगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक दीप्ती गायकवाड यांनी केले, तर ज्योती कोळी यांनी आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *