रोटरी क्लब व आधार संस्थेने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला दिवाळीचा आनंद

अमळनेर (प्रतिनिधी) दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नसून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, याचा प्रत्यय अमळनेर येथे आला. रोटरी क्लब अमळनेर व आधार संस्था अमळनेर यांच्या समन्वयाने अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांना दिवाळीनिमित्त फराळ, किराणा किट आणि कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.

सर्वांसोबत सण साजरा करण्यात जो आनंद आहे, तो दुसऱ्या कशातच नाही. प्रेम, आपुलकी आणि माणुसकीची भावना जपत समाजातील गरजू मुलांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून अंकुर सेवा सेतू प्रकल्पाच्या माध्यमातून आधार संस्था आणि रोटरी क्लब अमळनेर हे एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांना दर महिन्याला मदतीचा हात देत आहेत. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विशेष ठरला.

या उपक्रमांतर्गत आधार संस्थेतर्फे मुलांना किराणा किट देण्यात आले. रोटरीयन सचिन पारसमलजी चोपडा, शितल सृष्टी चोपडा यांनी प्रोटीन किट व स्वादिष्ट नमकीनचे वाटप केले. निलेश पाटील व विजय पाटील यांच्यातर्फे मुलांना दिवाळीचा फराळ देण्यात आला. मेहरिन बोहरी यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले सुंदर फ्रॉक्स मुलींना भेट दिले. तसेच आधार संस्थेचे कर्मचारी मुरलीधर बिरारी यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले..अमळनेरचे नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी कार्यक्रमाला भेट देऊन मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट महेश पाटील आणि रोटरीयन चेलाराम सैनानी उपस्थित होते.  संस्थेचे कार्यकारी संचालक रेणुप्रसाद, कार्यक्रम समन्वयक संजय कापडे व पूनम पाटील यांच्यासह मुरलीधर बिरारी, भावना सूर्यवंशी, उर्जिता पाटील, मोहिनी धनगर, दीप्ती पाटील, भावेश मराठे, दीपक विश्वेश्वर आणि तौसिफ खान यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकसूद भाई बोहरी यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाने यांनी केले. आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी रोटरी क्लब आणि सर्व दात्यांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *