खान्देश शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक भरतीच्या मुलाखतींना परवानगी नाही; दिलीप जैन यांचे उपोषण मागे

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित मुलाखतींना सहाय्यक संचालक, उच्च व तंत्र शिक्षण यांच्या कार्यालयाने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाय्यक संचालक डॉ. पराग मसराम यांनी उपोषणकर्ते दिलीप जैन यांना याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. दरम्यान, मुलाखतींच्या आयोजनासाठी नियमाप्रमाणे पत्रव्यवहार करून आवश्यक पूर्तता करण्याचे निर्देश संस्थेला देण्यात आल्याने नियोजित मुलाखती तूर्त स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खान्देश शिक्षण मंडळाची कार्यकारिणी धर्मादाय आयुक्तांच्या शेड्युल-१ नुसार अधिकृत नसल्याचा आरोप दिलीप जैन यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर प्राध्यापक भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी सहाय्यक संचालक, उच्च व तंत्र शिक्षण यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत ६ नोव्हेंबर रोजी सहाय्यक संचालक डॉ. पराग मसराम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले. या पत्रात प्रताप महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी मुलाखतींचे आयोजन करण्याकरिता संस्था अथवा महाविद्यालयाकडून मुलाखतींच्या तारखांबाबत प्रस्तुत कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मुलाखतींचे आयोजन करण्यासाठी कार्यालयाकडून संस्थेला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचेही नमूद केले आहे. भरती प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रातील तरतुदींनुसारच राबविण्याचे निर्देश संस्थेला देण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, संस्थेला पाठविण्यात आलेल्या स्वतंत्र पत्रात १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी मुलाखतींचे आयोजन कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर करण्यात आल्याची बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन मुलाखतींची तारीख, वेळ आणि शासकीय प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार करून आवश्यक पूर्तता करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. संस्थेकडून नियमानुसार पत्रव्यवहार व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतींची तारीख, वेळ आणि शासकीय प्रतिनिधीचे नाव याबाबत यथावकाश कळविण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान नियोजित असलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेवर तूर्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *